Breaking News

राजकारणात मी चांगल्या गोष्टी करते, पण त्याचं कौतुक करण्याऐवजी संभ्रम निर्माण केला जातो


पंकजाताई मुंडे यांची खासगी वृत्त वाहिनीला परखड मुलाखत 

माझ्या दारातील गर्दी कधी कमी होवू नये, एवढी शक्ती असावी हिच अपेक्षा

मुंबई : राजकारणात काम करत असतांना मी चांगल्या गोष्टी करते, वाईट करत नाही. कधी कुणाची प्रतारणा केली नाही, दिलेला शब्द प्रसंगी स्वतःचं नुकसान करून पाळलेला आहे पण त्याचं कौतुक करण्याऐवजी संभ्रम निर्माण केला जातो. माझ्या राजकीय भूमिकांवर शंका घेणारांनीच याविषयी वेगवेगळ्या शंका निर्माण केल्या. असं करणं म्हणजेच 'अभिमन्यू' करण्यासारखं आहे असं परखड मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी 'मुंबई तक' या वृत्त वाहिनीशी मुलाखत देतांना व्यक्त केलं.

  सावरगांव येथे झालेल्या दसरा मेळाव्यातील भाषणावर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, शिवाजी पार्क भरविण्या विषयी मी जे बोलले ,त्याचा राजकीय अर्थ कुणी काढू नये,हे कुणाला उद्देशून नव्हते. मी चांगलं काम करते, त्याचं कौतुक केलं जात नाही परंतू  अफवा पसरवून विनाकारण संभ्रम निर्माण केला जातो, अफवा पसरविण्याचं एक जाळ तयार केल जातयं व यालाच 'अभिमन्यू' करणं असं मी म्हणाले. माझ्या राजकीय भूमिकांवर शंका घेण्याचं काहीच कारण नाही, मी कधी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, प्रतारणा केली नाही, दिलेला शब्द स्वतःचं नुकसान करून पाळला. पक्ष माझ्या बापाचा, हे माझं पक्षावरील प्रेम आहे. माझ्याविषयी नेतृत्वाच्या मनात कुठलीही शंका नाही, मी जावं असं जरी कुणाला वाटलं तरी कुठेही जाणार नाही असं त्या म्हणाल्या.

शरद पवारांच्या संदर्भात केलेल्या ट्विट वर बोलताना त्या म्हणाल्या, ते एक  ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत, या वयातही न थकता त्यांच्या कामाचा झपाटा पाहिला म्हणून कौतुक केले, चांगल्याला चांगल म्हणणं ही आपली संस्कृती आहे, कौतुक केलं म्हणून ते माझ्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार देणार नाहीत असं थोडच होणार आहे, त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ लावला जाऊ नये. ऊसतोड कामगारांच्या संपावर बोलताना त्या म्हणाल्या, संपावर तोडगा काढण्यासाठी त्यांचा अनुभव कामी आला. पूर्वी त्यांचा व मुंडे साहेबांचा लवाद होता, तेच हा प्रश्न मिटवायचे, याला पक्षीय स्वरूप कधी येऊ दिले नाही, शेवटी काही झाले तरी आता या विषयात आम्ही एकत्र बसूनच निर्णय घेतला.

 एकनाथ खडसे यांच्या  प्रवेशाने पक्षाचे झालेले नुकसान कसं कमी करता येईल हे आम्हाला पहावे लागेल असंही त्या एका प्रश्नावर बोलताना म्हणाल्या. मराठा आरक्षणामुळे ओबीसी भांबावला नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी मी स्वतः आंदोलनात उतरले होते, ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असंही त्या म्हणाल्या.

माझ्या दारातील गर्दी कधीही कमी होऊ नये

पुढील काळात आपण स्वतःला कुठे बघता, यावर त्या म्हणाल्या, माझ्या दारातील गर्दी कधी कमी होऊ नये, माझ्याकडे येणारा माणूस निराश होऊ नये ,एवढी शक्ती माझ्याकडे असावी मग ती पदाच्या रूपात असेल,प्रतिष्ठेच्या की आणखी कशाच्या..असेही त्या म्हणाल्या.
No comments