Breaking News

स्वाभिमानी पदवीधर मतदार निश्चितच आपल्याला निवडून देतील : रमेश पोकळे

 

मराठवाडा शिक्षक संघाचा रमेश पोकळे यांना पाठिंबा जाहिर

लातूर  : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पदवीधर मतदार त्यांचा स्वाभिमान कायम राखण्यासाठी निश्चितपणे आपल्याला निवडून देतील, असा विश्वास या मतदार संघातील अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी लातुरात पत्रकार परिषदेत बोलतांना  व्यक्त केला. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाने रमेश पोकळे यांना आपला जाहिर पाठिंबा घोषित केल्याने पोकळे यांचे पारडे जड झाले आहे.

   

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या या निवडणुकीत आपण भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीची मागणी केली होती. सलग दोन तपांपासून अधिक काळ भाजपमध्ये कार्यरत असूनही आपल्याला उमेदवारीपासून अलिप्त ठेवण्यात आल्याने पदवीधरांची दीर्घकाळपासून प्रलंबित असणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने या निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे रमेश पोकळे यांनी यावेळी नमूद केले. आपण दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वात युवा मोर्चा, भाजप बीड  जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदीर्घ काळ काम केले आहे. आपण स्व. मुंडे यांचे कट्टर चाहते असून म्हणूनच उमेदवारी दाखल करण्यासाठी जाताना गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा सोबत नेला होता. आज मुंडे हयात असते तर त्यांनी या मतदार संघासाठी आपल्यालाच उमेदवारी दिली असती, एवढेच नव्हे तर आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना ते स्वतः आशीर्वाद द्यायला आले असते, असा विश्वासही पोकळे यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी पदवीधरांच्या समस्यांकडे ढुंकूनही पाहिले  नसल्याने त्यांच्याबद्दल मतदारांत प्रचंड नाराजीचा सूर आहे. या मतदार संघात गुत्तेदाराचे अतिक्रमण झाल्याचे नमूद करून भाजपने  घोटाळ्याचे गंभीर  आरोप असणारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचा आरोप त्यांनी केला. आपण विद्यापीठ अधिसभेवर काम केलेले आहे. एवढेच नव्हे तर शिक्षक - प्राध्यापकांच्या समस्यांसाठी सातत्याने चळवळीच्या माध्यमातून लढा देण्याचे काम केले आहे. असे असतानाही पक्षाने आपल्या उमेदवारीच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आपल्यासोबत  कोणतेही बडे नेते दिसत नसले तरी पदवीधरांचे  हजारो हात आपल्या सोबत असल्याने स्वाभिमानासाठी मतदार आपल्याला प्रथम पसंतीचे मत देऊन निश्चित विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठवाडा शिक्षक संघाचा पोकळेंना पाठिंबा

या निवडणूकीसाठी  मराठवाड्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या मराठवाडा शिक्षक  संघाने अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांना  आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पदवीधर, शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त गुणात्मक शिक्षणासाठी आग्रही भूमिका घेणारा चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ता विधानपरिषदेत गेला पाहिजे या हेतूने मराठवाडा शिक्षक संघाने आपला पाठिंबा पोकळे यांना  जाहीर केला असल्याचे संघाचे अध्यक्ष पी.एस. घाडगे, सरचिटणीस व्ही.जी. पवार, कोषाध्यक्ष गोविंदराव निटुरे, सहसचिव विश्वांभर भोसले, बीड जिल्हाध्यक्ष राजकुमार कदम आदी पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत संघाच्या पाठिंब्याची घोषणा केली. यावेळी स्वप्निल केंद्रे, प्रा. डॉ. नामदेव सानप आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


No comments