Breaking News

बिबट्याच्या तावडीत अडकलेल्या आईचा जीव मुलामुळे वाचला


त्या माऊलीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार

के. के. निकाळजे । आष्टी

अक्षरशः बिबट्याच्या दहशतीने नागरिकांची झोप उडाली असून कालच एका नऊ वर्षीय मुलाचा बिबट्याने बळी घेतल्याची घटना उलटत नाही, तोच शेतात काम करीत असलेल्या माय- लेकरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगरूळमध्ये सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवानं मुलाने आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने पळ काढला आणि त्याच्या तावडीत सापडलेल्या आईचा जीव वाचला. त्या जखमी झालेल्या माऊलीस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने मायलेकरु मात्र भयभीत झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आष्टी शहरापासून अवघ्या पाच - सहा कि. मी. अंतरावर असलेल्या मंगरूळ येथील शिलावती दिंडे (वय ४२) व त्यांचा मुलगा अभिषेक दिंडे हे आपल्या शेतात तुरीच्या शेंगा शनिवारी दुपारी तोडत होते. मात्र, त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने कामात व्यस्त असलेल्या शिलावती यांच्यावर हल्ला चढविला.


आईवर बिबट्याने हल्ला केल्याचं पाहून अभिषेकने प्रसंगावधान राखून आरडाओरड केली. यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात शिलावती ह्या जखमी झाला असून अभिषेक सुखरूप असल्याची माहिती मिळते.  

या हल्ल्यात शिलावती यांच्या  मांडीवर आणि उजव्या हाताला बिबट्याने चावा घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. अभिषेकमुळे त्याची आई बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावली. त्यांच्यावर आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून ही मायलेकर भयभीत झाली आहेत. 

 

शिलावती यांनी शेतात काम करत असताना अंगावर स्वेटर आणि गळ्याभोवती गुंडाळले असल्याने त्या बिबट्याच्या तावडीतून सुटल्या असं आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाठ म्हणाले. तसेच या बिबट्याने अपेक्षेपेक्षा जास्त अंतर कापले असून किन्ही पासून हे अंतर 10 किमी पेक्षा जास्त आहे. कोणताही बिबट्या हल्ला करत नसून माणसावर हल्ला करणारा एखादाच असू शकतो असेही वनपरिक्षेत्र अधिकारी शिरसाठ यांनी सांगितलं.  

नरभक्षक बिबट्याने आष्टीकरांची उडवली झोप  

नरभक्षक बिबट्याने मानवी वस्तीवर आपला मोर्चा वळवला असून तो माणसांना लक्ष करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान आष्टीत बिबट्याच्या मानवावरील हल्ल्याच्या घटनेत वाढ झाल्यानं आष्टीकरांची झोप उडाली आहे तर जिल्हा चिंतातुर झाला आहे. 

No comments