Breaking News

खडीक्रेशरमुळे अनाथश्रमातील मुलांचा जीव धोक्यात!

जिल्हाधिकार्‍यांनी दखल देण्याची गरजबीड :  गेवराई येथील आई जनहित सेवाभावी संस्थेने स्व. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून लोकसहभागातून पालख्या डोंगराच्या पायथ्याशी सहारा अनाथाल सुरु केले होते. सध्या या अनाथालयाच्या बाजुला प्रशासनाने एका खडी क्रशरला मंजुरी दिल्याने भविष्यात मोठा धोका होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाने या खडी के्रशरला दिलेली मंजुरी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी सहारा परिवारातील हितचिंतकांनी केली आहे. यासंबंधी सहारा परिवाराचे संस्थापक संतोष गर्जे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी व इतरांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

सन 2005 साली संतोष गर्जे या ऊसतोड मजुराच्या मुलाने समाजातील अनाथ मुलांचं पालकत्व स्विकारून गेवराईत छोटेखाली सहारा अनाथालय हा प्रकल्प उभारला. समाजातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीवर आता हा प्रकल्प स्वतःच्या तीन एकर जागेत उभा राहीला आहे. गेवराई जवळील पालख्या डोंगराच्या पायथ्याशी हा प्रकल्प उभारण्यात आला. सध्या या प्रकल्पात 100 च्या आसपास अनाथ व 20 ते 30 स्वयंसेवक महिला, मुली वास्तव्यास आहेत. या मुलांचं शिक्षण ते त्यांना त्यांचा संसार उभा करून देण्यापर्यंत ही संस्था काम करते. या प्रकल्पाची देशातील अति महत्वाच्या व्यक्तींनी दखल घेऊन भेट देखील दिली आहे. 

काही दिवसापुर्वी या प्रकल्पासाठी वीजेची मागणी करण्यात आली होती. मात्र सुमारे दोन वर्ष मोठा संघर्ष केल्यानंतर हा मागील नऊ महिन्यापुर्वी येथे वीज उपलब्ध झाली. ही वीज जोडणी देण्यासाठी महावितरणने फाऊंडेशनकडून दहा लाख रुपयांचं कोटेशन भरून घेतले. या कोटेशनसाठी महावितरण व महसूल प्रशासनातील अनेक अधिकार्‍यांनी आर्थिक मदत केली होती. या प्रकल्पातून इतर कुठेही वीज जोडणी द्यायची झाली तर आगोदर आई संस्थेची ना हरकत लागते. मात्र महावितरणमधील एका अधिकार्‍याने लालसेपोटी अशी कुठलीही परवानगी न घेता मागील तारखेत खडी के्रशरला नियमबाह्यपणे तत्काळ जोडणी उपलब्ध करून दिली. सर्वात आधी ही जोडणी रद्द करण्याची मागणी करण्यात सहारा परिवाराच्या हितचिंतकांकडून करण्यात आली आहे.

खडी के्रशरला परवानगी दिली कशी?
खडी क्रेशरला परवानगी देताना महसूलच्या गौण खनिज विभागाने पर्यावरणाचं व जनतेच्या आरोग्याला काही नुकसान होईल का याची तपासणी करण्यासाठी स्पॉट व्हिजीट करणे गरजेचे होते. ज्या ठिकाणी खडी क्रशर उभारले तेथून 200 मीटरवर बालग्रामची इमारत उभी आहे. खडी के्रशरला लागणार्‍या दगडांचा ब्लास्ट केल्याने येथील अनाथ मुलांच्या जिवीतास धोका उत्पन्न झालेला आहे. वृध्द मंडळी या परिसरात वॉक करतात त्यांच्याही जिवीतास धोका निर्माण झाला आहे. खडी क्रेशरमुळे धुळीचा मोठा त्रास होत असून बालग्राम परिवाराने लोकसहभागातून तयार केलेल्या रस्त्याची देखील वाट लागणार आहे. पर्यायाने पावसाळ्यात येथील मुलांना शिक्षणासाठी मुकावं लागेल.


जिल्हाधिकार्‍यांनी हा प्रकल्प वाचवावा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या प्रकल्पास भेट देऊन येथील वस्तुस्थिती समजून घ्यावी. जर काही चुकीचं होत असेल तर त्याला तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र भरातील बालग्राम परिवाराच्या हितचिंतकांनी केली आहे.


No comments