Breaking News

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी रमेश पोकळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 


प्रदेशाध्यक्षांशी चर्चा न्याय मिळेल-रमेश पोकळे 

औरंगाबाद :  औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थायी समितीचे माजी चेअरमन शिक्षक पदवीधर नेते रमेश पोकळे यांनी आज आपल्या निवडक समर्थकांसह उमेदवारी अर्ज लोकनेते  गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला सोबत घेऊन दाखल केला.यावेळी आपली भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा झाली असून आपल्याला पक्षाकडून न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश पोकळे म्हणाले की, भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब आज हयात असते तर या निवडणुकीची अधिकृत उमेदवारी मलाच जाहीर झाली असती. एवढेच नव्हे तर साहेब स्वतःमाझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिले असते. परंतु दुर्दैवाने आज साहेब नाहीत त्यामुळे आपण साहेबांची प्रतिमा सोबत घेऊन त्यांच्या आशीर्वादाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

संपूर्ण मतदारसंघात आपला अखंड जनसंपर्क आहे. शिक्षण क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षापासून आपण सक्रिय कार्य करीत आहोत त्यामुळे मला उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. पक्षाने आपणास उमेदवारी द्यावी याबाबत आपण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटिल यांच्याशी दोन दिवसांपूर्वी चर्चा केली आहे. पक्षाकडून आपणास न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करून पक्षाला आपल्याला क्रमांक एक ची उमेदवारी देणे शक्य नसेल तर दुसरा उमेदवार म्हणून उमेदवारी दिली तरी आपण राष्ट्रवादीला पराभूत करू शकतो असा समांतर प्रस्ताव आपण पक्षासमोर ठेवला आहे. या मतदारसंघात मतदान पक्षीय चिन्हावर नव्हे तर पसंती क्रमांकावर होते त्यामुळे या मतदारसंघात दोन उमेदवार  द्यावेत  असा प्रस्ताव पक्षाकडे दिला आहे.

उमेदवारी दाखल करणे म्हणजे बंडखोरी नव्हे....आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे पक्ष स्तरावर न्याय निर्णय होईल किंवा आपणास क्रमांक दोनची उमेदवारी जाहीर होईल या विश्वासाने आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असेही रमेश पोकळे म्हणाले.


No comments