Breaking News

मांजरा धरण भरले; लातूर, बीड, उस्मानाबादकरांमध्ये समाधान ..!

संग्रहीत

महसूलीदृष्ट्या बीडमध्ये गणला जाणार्‍या या प्रकल्पावर कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई, लातूर शहर व एमआयडीसी, मुरूड या शहरासह पन्नासेक गावाच्या पाणीपुरवठा योजना निर्भर

परळी :  केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प 100% भरले आहे.  बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.  परतीच्या जोरदार  झालेल्या पावसामुळे मांजरा धरनात पाण्याचा येवा वाढला होता. यामुळे बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रीन बेल्ट मधील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. यामुळे बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.

मांजरा धरणांत  मागच्या दोन महिन्यापासून दखलपात्र येवा सुरू होता.  लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यासाठी ही सुखद वार्ता असून बांधणीपासूनच्या चाळीस वर्षात मांजरा प्रकल्पात शतप्रतिशथ पाणीसाठा होण्याचा हा चौदावा योग आहे. पाटोदा तालुक्यात उगम पावत बीड,ऊस्मानाबाद जिल्ह्याची सिमा बनून प्रवाही होत असलेल्या मांजरा नदीवर धनेगाव (ता.केज) व दाभा (ता.कळंब) यांच्या मधोमध उभारण्यात आलेल्या मांजरा प्रकल्पाची १९८० मध्ये बांधणी पुर्ण  झाली. महसूलीदृष्ट्या बीडमध्ये गणला जाणार्‍या या प्रकल्पावर कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई, लातूर शहर व एमआयडीसी, मुरूड या शहरासह पन्नासेक गावाच्या पाणीपुरवठा योजना निर्भर आहेत. शिवाय यातील धारूर वगळता इतर चार  तालुक्यातील शेतीलाही प्रकल्पाचा आधार मिळतो. यामुळेच मांजराच्या पाणीसाठ्यावर तिन्ही जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झालेलं असतं.यंदा मागच्या दोन महिन्यांपासून मांजरा प्रकल्पात येवा येत असला तरी तो जेमतेम होता.यामुळे मजल, दरमजल करत मांजराने अखेर शतकपूर्ती करण्यात यश मिळवले आहे.

1 ऑक्टोबरला १३७ दलघमीवर असलेला प्रकल्प पुढील विस दिवसात २०० दलघमी पार झाला होता. पुढं यात वाढ होत अखेर मंगळवारी रात्री प्रकल्प आपल्या २२४.०९३ दलघमी या पुर्ण क्षमतेन भरला आहे. पाण्याच्या आवकीनुसार विसर्ग करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . 

 १४ वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले....

प्रकल्पाची बांधणी १९८० साली तर दोन्ही कालव्याचे काम १९८६ साली पुर्ण झाले. यातील डावा कालवा ९० तर उजवा कालवा ७८ किलोमीटर लांबीचा आहे.जोतापातळी ६३५.७२ मिटर,पुर्ण संचय पातळी ६४२. ३७ मिटर आहे.एकूण साठवण क्षमता २२४.०९३ तर मृतसाठा ४७.१४० दलघमी आहे.धरण प्रथम १९८८ साली भरले. यानंतर १९८९, १९९०, २००५, २००६,२०१०,२०११, २०१६, २०१७ या सालात सलग दोन वर्ष भरले. याशिवाय १९९६,१९९८ व २००० व २००८ असे १३ वेळा पुर्ण भरले होते. यंदा २६ सप्टेंबरला पन्नास टक्के साठा होता, तो पुढं महिनाभरात शंभर टक्के साठा झाला असून आजउद्या पाण्याचा विसर्ग केल्यास हा ओव्हरफ्लोचा हा चौदावा योग ठरणार आहे. 

या गावांना होणार फायदा

कळंब शहरापासूनच बॅकवॉटर सुरू होतं.पुढं रांजणी पर्यंतच्या मांजरा बेल्टमधील बॅकवॉटरच्या कळंब,खडकी,लोहटा,कोथळा, हिंगणगाव,करंजकल्ला आदी तर लाभक्षेत्रातील दाभा, शिरपूरा, सौदंणा, लासरा गावासह ताडगाव, घारगाव, रांजणी आदी तालुक्यातील १७ गावातील शेतीला मांजरा प्रकल्प वरदान ठरतो.  अंबाजोगाई तालुक्यातील देवळा, इस्थळ, सौंदाना, सोमनाथ बोरगाव, आपेगाव, अंजनपूर कोपरा, धानोरा, तडोळा, मुढेगाव,  या गावांना मांजरा धरणाच्या  डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. तर लातूर तालुक्यातील तांदुळजा, सारसा, टाकळगाव, वांजरखेडा, जवळा, कानडी बोरगाव, गादवड, यासह अनेक गावांना  मांजरा धरणाच्या उजव्या  कालव्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. 

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले जलपूजन

मांजरा नदीवर असलेले आणि बीड लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचे असलेले मांजरा धारण हे परतीच्या पावसाने तुडुंब भरले आहे. बीड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पापैकी एक असलेल्या मांजरा धरण  भरल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे आणि आ. संजय दौंड यांच्या उपस्थितीत धरणाचे जलपूजन केले.


No comments