पार्थ पवारांना जे सुचलं ते शरद पवारांना योग्यवेळी सुचलं असत तर मराठा समाजावर आत्महत्येची वेळ आलीच नसती - रमेश पोकळे
बीड : तालुक्यातील केतुरा येथील 18 वर्षीय विवेक कल्याण रहाडे या मराठा तरुणाने मराठा आरक्षणाच्या स्थगिती नंतर नैराश्यातुन आत्महत्या केली. या संदर्भात राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनी आपला संवेदनशीलपणा दाखवून सोशल मेडियात ट्विट करून विवेक रहाडे या मराठा युवकाच्या आत्महत्या बद्दल शोक व्यक्त करत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी आंदोलन उभा करणार असल्याचे जाहिर केले आहे हे वाचून मराठा समाजातील सर्वाना आनंद झाला. पहील्यांदाच पवार घराण्यातील कोणीतरी आरक्षणावरती सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. पण ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्वतः महाराष्ट्राचे अनेक वर्ष मुख्यमंत्री असताना तसेच केंद्रातील जबाबदार मंत्रीपदावर असताना समाजाच्या मराठा आरक्षण संदर्भात सकारात्मक भुमिका घेतली असती किंवा या संदर्भात आवाज उठवला असता तर आज मराठा समाजावर आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आलीच नसती अशी प्रतिक्रिया अण्णासाहेब पाटील सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष तथा मराठा आरक्षण बचाओ समाज जागरण परिषद मराठवाडा चे संयोजक रमेशभाऊ पोकळे यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की काल केतुरा या गावातील युवक विवेक कल्याण रहाडे या युवकांनी शैक्षणिक नैराश्यातून आत्महत्या केली. गोर गरिब मराठा समाजाला आरक्षनामुळे न्याय हक्क मिळण्यास सुरुवात झाली होती परंतु आता आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे व त्यामुळे माझा नंबर मेडिकल ला लागत नाही हे लक्षात आल्यामुळे विवेक या विद्यार्थ्यांने टोकाची भूमिका घेऊन काल चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. माझ्या बलिदानाने समाजाला न्याय मिळावा ही माफक अपेक्षा त्याने चिठ्ठी मध्ये लिहून ठेवली. यासंदर्भात विवेक च्या दुर्दैवी आत्महत्येनंतर पार्थ पवार यांनी मराठा समाजासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले. पण जे पार्थ पवारांना सुचले हेच जर शरदचंद्रजी पवार साहेबांना योग्यवेळी सुचले असते तर मराठा समाजातील बेचाळीस युवकांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या अशी संतापजनक प्रतिक्रिया मराठा समाजिक चळवळीतील गेल्या 25 वर्षापासून संघर्ष करणारा एक मराठा सेवक या नात्याने मला वाटते असे मत रमेशभाऊ पोकळे यांनी पञकात व्यक्त केले आहे.
No comments