Breaking News

पैशासाठी जन्मदात्रीला जाळून मारण्याचा प्रयत्न

आईच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल, धक्कादायक घटनेनंतर दोन मुलांना केलं जेरबंद गौतम बचुटे । केज

पैशासाठी दोन मुलांनी चक्क आपल्या जन्मदात्रीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. ही धक्कादायक घटना केज तालुक्यात घडली.  

मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील चिंचोली कानडी माळी येथील इंदुबाई कुचेकर यांना दोन मुले आहेत. त्यांचे पती लालासाहेब कुचेकर हे पोलिस सेवेत होते. काही वर्षांपूर्वी ते बेपत्ता झाले होते. दरम्यान त्यांचा शोध लागत नसल्याने अखेर त्यांना मयत घोषित करण्यात आले होते. लालासाहेब कुचेकर यांच्या पश्चात वारस म्हणून त्यांची पत्नी इंदुबाई कुचेकर यांना भविष्य निर्वाह भत्ता व त्यांच्या खात्यावरील जमा असलेली रक्कम एकूण ९ लाख रुपये त्यांच्या  बँक खात्यावर जमा करण्यात आले होते.

त्यातील बरीचशी रक्कम इंदूबाई यांनी आपली मुले संतोष कुचेकर व नितीन कुचेकर यांना दिली होती. मात्र उर्वरित असलेल्या  ४ लाख ८४ हजार रुपये ही आम्हाला दे अस म्हणत संतोष व नितीन यांनी आई इंदूबाई यांच्याकडे सारखा तगादा लावला होता. मात्र पैसे देण्यासाठी इंदूबाई मुलांना तयार नव्हत्या. त्यामुळे संतोष व सचिन या दोघांनी संगणमत करून पैशासाठी आपल्या आईशी सतत भांडण करीत होते. शनिवारी (दि.३) संतोष कुचेकर व सचिन कुचेकर या दोघांनी आपली जन्मदात्या आई इंदुबाई कुचेकर यांना तुझ्या नावावर असलेले भविष्य निर्वाह निधीतील पैसे का देत नाहीस म्हणून भांडण केले. त्यानंतर रात्री  ७ वाजण्याच्या सुमारसास गावातील  शिवाजी रघुनाथ राऊत यांच्या पाण्याच्या जारच्या दुकानासमोर आई इंदुबाई यांच्या  अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या  गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी इंदुबाई कुचेकर यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात गु.रं.न. ४२२/२०२० भा.द.वि. ४०७ व ३४ नुसार संतोष कुचेकर आणि सचिन कुचेकर या दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य पाहता प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना दि. ६ ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या धक्कादायक घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 
No comments