Breaking News

परळी, अंबाजोगाई, केज सह आष्टी तालुक्यातील पीक नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश


बीड : 
जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई , केज व आष्टी तालुक्यातील परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने फेर पंचनामे करून सुधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला असून, त्यामध्ये परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी तालुक्यांचा ३३% पेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल निरंक असल्याच्या बातम्या काही दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याने धनंजय मुंडे यांनी तातडीने फेर पंचनामे करावेत असे निर्देश दिले आहेत. 

नुकताच ना मुंडे यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दौरा करून झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द ना. मुंडेंनी राज्य शासनाच्या वतीने दिला होता. 

राज्य शासनाने घोषित केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेज मधून शेतकऱ्यांना थेट मदत मिळण्यासाठी कृषी व महसूल विभागाने केलेले हे पंचांनामे महत्वाचे ठरणार आहेत. या पंचनाम्यांमध्ये मानवी दोष असून, त्यामुळेच तीन तालुक्यातील ३३% पेक्षा जास्त नुकसानीचा अहवाल निरंक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची हयगय न करता तातडीने फेर पंचनामे करावेत असे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले असून, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, एकही नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी आश्वस्त केले आहे.


No comments