Breaking News

मोकाट जनावरे पुन्हा रस्त्यावर : मालक मात्र प्रशासनाला देईनात दाद..!


बाळकृष्ण मंगरूळकर ।  शिरूर का. 
 

येथील नगर पंचायत प्रशासनाने शहराच्या हद्दीत मोकाट जनावरांचा वावर वाढू लागला. त्यामुळे त्यांच्या मालकांनी आपल्या गुरांची व्यवस्था तीन दिवसात करावी, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी जाहीर दवंडी दिली होती. परंतु  मोकाट जनावरांचे मालक प्रशासनाच्या जाहीर आवाहनाला मात्र दाद देत नसल्यानं जनावरे पुन्हा रस्त्यावर जैसे थै दिसत आहेत. यामुळं नागरिकांसह  प्रशासन सुद्धा मोकाट जनावरांच्या मालकांसमोर हतबल झाल्याची चर्चा शिरूरकरांमध्ये होत आहे. 

शहरातील मुख्य रस्त्यांसह बाजारपेठेत मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. यामुळे भाजीपाला व फळ विक्रर्त्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय वाहनधारकांसह नागरिकांना ये- जा करण्यास अडथळा होत असून परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळं मोकाट जनावरांचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ शिरूरकरांवर आली आहे. त्यातच नगर पंचायत प्रशासनाला तक्रारी प्राप्त झाल्यानं मोकाट जनावरांच्या मालकांनी आपल्या गुरांची व्यवस्था तीन दिवसांच्या आत करावी. अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी जाहीर दवंडी देण्यात आली होती. 

परंतु तीन दिवसांचा कालावधी लोटला असून मोकाट जनावरांच्या मालकांनी आपल्या गुरांची व्यवस्था अद्याप केलेली नसल्यानं शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच बाजारपेठेत मोकाट जनावरे ठाण मांडून आहेत. नगर पंचायतीने दिलेली मुदत संपून गेली असून प्रशासन मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करताना दिसत नसल्याची चर्चा होत असून मोकाट जनावरांच्या मालकांसमोर नगर पंचायत हतबल झाली आहे, का?  असा संतप्त सवाल शिरूरकरांमधून उपस्थित केला जात आहे. मात्र मोकाट जनावरांचे मालक नगर पंचायत प्रशासनाला दाद देत नसल्याचं दिसत आहे. 


जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करणार- मुख्याधिकारी सानप


नगरपंचायतच्या वतीने दोन दिवसापूर्वी मोकाट जनावरे संदर्भात तक्रारदारांच्या तक्रारीनुसार वैयक्तिक रित्या १७ ते १८ जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तरी देखील ज्यांची जनावरे आहेत, त्यांनी जर ती डांबून ठेवली नसतील तर त्यांच्यावर रीतसर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल. असे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा नायब तहसिलदार किशोर सानप 'दृष्टिकोन'शी बोलतांना म्हणाले. No comments