Breaking News

ऊसतोड मजुरांनो, संप संपलेला नाही २७ ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णय होईल तोपर्यंत घरीच थांबा - आ.सुरेश धस यांचे आवाहन

के. के. निकाळजे । आष्टीसंपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब ऊसतोड मजुरांना तुमच्या घामाच्या, रक्ताच्या, कष्टाच्या मजुरीमध्ये वाढ जाहीर झाल्याशिवाय हा संप संपणार नाही. दि.२७ ऑक्टोबर रोजी साखर संघ आणि मजुरांच्या संघटना यांची बैठक मा. खा. शरद पवार साहेब यांच्या बरोबर होणार आहे. त्या बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याने तोपर्यंत मजुरांनी आपल्या गावी थांबावे कारखान्याकडे जाऊ नये असे आवाहन आ. सुरेश धस यांनी केले.

आष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत गोपीनाथराव मुंडे साहेब ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे सचिव सुखदेव सानप,कार्याध्यक्ष तात्यासाहेब हुले आणि संघटनेचे नेते दशरथ दादा वणवे हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले,गोपीनाथराव मुंडेसाहेब ऊसतोडणी मजूर, मुकादम आणि वाहतूकदार संघटना, महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटना आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला आदेशीत केल्यामुळे आम्ही सर्वांनी महाराष्ट्र राज्यभर दौरा करून ऊसतोडणी मजुरांशी संवाद साधला असून या वर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व संघटनांनी मिळून  १) ऊसतोडणी मजुरांच्या दरांमध्ये दीडशे टक्के वाढ मिळावी मुकादमच्या कमिशनमध्ये १८.५ रुपयेवरून ३७ रुपये वाढ आणि वाहतूक ठेकेदारांना ५० टक्के वाढ मिळाली आणि २) साखर कारखान्याचे ट्रस्ट म्हणजे प्रिन्सिपल एम्प्लॉयर बरोबर करार करतो कामगारांना उचल देतो कारखान्याने दिलेल्या रकमेपेक्षा मुकादम मजुरांना बैलगाडी सेंटर,डोकी सेंटर आणि गाडी सेंटर यांना पाचपटीने रक्कम देतो ही उचल (ऍडव्हान्स) प्रक्रिया कायद्याच्या कक्षेत आणावी आणि त्यांना कायद्याचे संरक्षण द्यावे. ३) कारखाना थळावर सार्वजनिक स्वच्छतागृह असावेत.

 या मागण्यांसह अन्य मागण्या आम्ही या दोन्ही संघटनेच्या वतीने केलेल्या आहेत. आणि नुकतेच समजले आहे की, साखर संघाने मंगळवारी दि.२७ ऑक्टोबर २०२० रोजी पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी येथे सर्व संघटना व साखर संघ यांची मा. खा. शरद पवार साहेब यांच्या सोबत बैठक आयोजित केली आहे गोरगरीब वंचित, शोषित ऊसतोड मजुरांच्या पोटापाण्याच्या हा प्रश्न महत्त्वाचा असून या बैठकीत निर्णय होणार असल्याने ऊसतोड मजुरांनी आपली जागा सोडू नये. कोयता बंद हा संप संपलेला नाही. ऊसतोड मजूर संघटना आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून समस्त मजूर वर्गाला मी आवाहन करतो असे सांगत आमदार सुरेश धस म्हणाले की दि.२५ ऑक्टोबरला दसरा सण आहे आणि काही ठिकाणी दुसर्‍या दिवशी कर साजरी करतात आणि दोन दिवसांनी बैठक होत आहे त्यामुळे दोन दिवस मजुरांनी कोणाच्याही दडपशाहीला बळी पडू नये असे सांगितले.

वाहतूक ठेकेदारांना जबरदस्ती करू नका

ऊसतोड मजुरांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन धाक दाखवून मजुरांना कारखान्याकडे घेऊन जायचा प्रयत्न करू नका असा प्रयत्न कुणी वाहतूकदार ठेकेदार यांनी केल्यास त्यांचे वाहनाचे, मालमत्तेचे नुकसान झाल्यास तेच जबाबदार राहतील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूक ठेकेदारांनी अशी हिंमत करू नये असा इशाराही आ. धस यांनी शेवटी दिला.


No comments