Breaking News

मढयाच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय ...?


काम न करताच कब्रस्तानच्या 
संरक्षक भिंतीचे पैसे हडप केल्याचा माहिती अधिकारात उघड

गौतम बचुटे । केज  

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते असे एका कविने लिहिले आहे. परंतु केज तालुक्यातील एका गावात चक्क एका मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानची संरक्षक भिंतीचे बांधकाम न करताच दोन लाख रु. चा निधी हडप केल्याची घटना माहिती अधिकारात उघड झाली आहे. ग्रामस्थांनी या बाबत तक्रार करून उपोषणाचा इशारा दिला आहे.

केज तालुक्यातील आवसगाव येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी २ लाख रु. निधी मंजूर होऊनही संरक्षक भिंतीचे बांधकाम केलेले नाही. तो निधी सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून उचलून हडप केला असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी हेळसांड होत असल्याचा उल्लेख केला आहे.

या संरक्षक भिंतीच्या कामास सन २०१३ मध्ये तांत्रिक मान्यता देण्यात आली. त्याचा क्र. टीएस क्र.९९ दि.२५/४/३०१२ असून सदर काम सुरू करण्या संदर्भात कार्यरंभ आदेश जा.क्र.पं स के/बां/ कावि१६३३ दि.२९/५/२०१३ रोजी दिलेला आहे. कामाच्या अंदाज पत्रकात भिंतीचे पंधरा कॉलम असून कॉलम व वीट बांधकामाची उंची १.६५ मीटर असल्याचा उल्लेख आहे. तसेच प्लॅस्टर व रंगकाम याचाही उल्लेख आहे. या कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीची लांबी सुमारे ४० मीटर असून दोन उभ्या कॉलम मधील अंतर हे सुमारे ३.२५ मीटर एवढे आहे. तसेच तेवढ्याच लांबीचा आडवा बिमचा देखील अंदाज पत्रकात समावेश आहे. 

काम सुरू करण्या संदर्भात ग्रामपंचायच्या नावाने कार्यरंभ आदेशात असून तांत्रिक मार्गदर्शन व देखरेख हे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हे नाळवंडीकर यांचे नाव आहे. एवढे असूनही मात्र या भिंतीचे बांधकाम न करताच दोन लाख रु. हडप केले आहेत. अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजित कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार मेंढके व गटविकास अधिकारी दराडे यांच्याकडे केली आहे. जर या बाबत कठोर कार्यवाही झाली नाही; तर उपोषणाचा इशारा देखील दिला आहे. निवेदनावर शेख खय्यूम, शेख सरफराज, शेख रहीम, शेख शकील, सय्यद इलाही, शेख शेखनूर, शेख महेबूब, शेख महम्मद, शेख याकूब, शेख युनूस, शेख शकील, शेख गफूर, शेख शौकत, शेख नजीर यांच्या सह्या आहेत.No comments