Breaking News

कामगार कायदा आणि भाववाढ होईपर्यंत संप सुरुच राहणार : आ.सुरेश धसके. के. निकाळजे । आष्टी

गेल्या दोन महिन्यापासून ऊसतोड कामगारांना भाव मिळण्यासाठी व ऊसतोड कामगार कायदा करण्यासाठी संप सुरू असून अद्याप पर्यंत साखर संघाने व कारखानदारांनी कोणतीही चर्चा केली नाही त्यामुळे ऊसतोड कामगारांना दिडशे तर मुकादम यांना 37 टक्के भाववाढ तसेच ऊसतोड कामगारांसाठी कायदा केल्याशिवाय कारखाने सुरु होणार नसून संप सुरुच राहणार असल्याचे आ.सुरेश धस यांनी सांगितले.ते आष्टी येथे ऊसतोड मजुर,मुकादम व वाहतूकदारांच्या बैठकीत बोलत होते.

 

पुढे बोलताना आ.सुरेश धस म्हणाले की हा लढा वंचित व शोषित असलेल्यांचा लढा आहे. या लढ्याला खूप जुनी परंपरा आहे.स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांनी कामगारांसाठी मोठा लढा दिला आहे.हि दौलत मुंडे साहेबांची आहे.माञ सद्यस्थितीत साखर कारखानदारांनी या शोषित पिडीत ऊसतोड मजुरांचे शोषण करण्याचे काम चालविलेले असून ते जितक काम करतात तितका त्या कामाचा या मजुरांना मोबदला मिळत नाही.आणि यासाठीच ख-या अर्थाने हा लढा उभारण्याचे काम आपण केले.यासाठी महाराष्ट्रातील एकूण अकरा ऊसतोड कामगार संघटनांनी एकत्र येऊन हा लढा आपण उभारा आणि या सर्व संघटनांनी व भारतीय जनता पार्टीने मला राज्यात दौरा करण्याची परवानगी दिल्याने मी हा लढा हाती घेतला.

ऊसतोडणी कामगारांची मते चालतात मग या ऊसतोड कामगारांना न्याय का मिळत नाही हा सवाल आ.धस यांनी उपस्थीत करत जर योग्य दरवाढ यंदा मिळाली नाही तर येणाऱ्या काळात ऊसतोड कामगार साखरसंघाला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.यापूर्वी साखर संघाने ऊसतोड कामगारांना तीन वेळा फसवले आहे गेल्या सहा वर्षापासून भाव वाढ झाली नसल्याचे सांगत एक वर्ष तर या साखरसंघांनी ऊसतोडणीचे प्रोसेडींगच लिहिले नाही.त्यामुळे या वर्षी दिडशे टक्के भाव वाढ झाल्याशिवाय हा संप मिटणार नसल्याचे प्रतिपादन आ.धस यांनी केले.हा प्रश्न एक वर्गाचा अथवा एका घटकाचा नसून या राज्यातील 13 लाख ऊसतोड कामगारांचा आहे.काबाडकष्ट करुन हा ऊसतोडणी कामगार राबराब राबत असतो.त्यामुळे त्यांचे होणारे शोषण कदापीही सहन करणार नसल्याचा पुनरुच्चार करीत हे आंदोलन तोडगा निघेपर्यंत सुरूच राहणार असल्याचेही आ.धस यांनी ठासून सांगितले.यावेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजुर संघटनेचे सचिव सुखदेव सानप,श्रमिक ऊसतोड मजुर संघटनेचे सचिव विष्णूपंत जायभाय,कार्याध्यक्ष तात्यासाहेब हुले,दशरथ वनवे,रामकिसन भोंडवे,घोळवे मुकादम आदी मान्यवर उपस्थीत होते.

ऊसतोड मजुरांच्या दरात जोपर्यंत वाढ होत नाही तोपर्यंत एकही ऊसतोड मजुर बीडच काय तर राज्यातूनही हलणार नाही.असे दशरथ वनवे यांनी सांगितले.

ऊसतोड मजुरांचा संप अजून संपलेला नसून विनाकारण काहीजण संपात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत माञ जोपर्यंत आपच्या मागण्यांची पुर्तता होणार नाही तोपर्यंत एकही गाडी हलणार नसल्याचे गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजुर मुकादम वाहतुकदार संघटनेचे राज्याचे सचिव सुखदेव सानप यांनी सांगितले.

27 तारखेच्या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर संप सुरुच राहिल शिवाय यंदा पाऊस जास्तीचा आहे पीके जोमात आहेत.त्यामुळे एक वर्षी ऊसतोडला नाही तर आम्ही उपाशी राहत नाहीत हे कारखानदारांनी ओळखून घ्यावे असे मत श्रमिक ऊसतोड मजुर संघटनेचे सचिव विष्णूपंत जायभाय यांनी व्यक्त केले.


No comments