Breaking News

परळीचे रोखठोक आंदोलन तात्पुरते स्थगित : धोकाधडी झाल्यास पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन करू -अमित घाडगेपरळी : मराठा आरक्षण तथा शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर परळीत 8 ऑक्टोबर पासून मराठा क्रांती मोर्चा व सकळ मराठा समाजाच्या वतीने रोखठोक आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकार राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यास सकारात्मक झाल्यामुळे या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात येत असल्याचे आंदोलकांनी जाहीर करून शुक्रवारी सायंकाळी आंदोलनस्थळ सोडले.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातचं राज्यात रविवारी एमपीएससी परीक्षा होणार होत्या व यामुळं मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला यश आले असून एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, याबाबतची घोषणा काल सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या घोषणेनंतर परळीतून सुरू करण्यात आलेले आंदोलन काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे.

 मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे म्हणाले की, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने मराठा समाजातील मुलांचे नुकसान तात्पुरते टाळले आहे. परंतु भविष्यातील मराठा आरक्षणाबाबतची आणि नोकर भरतीबाबतची भूमिका ठाम असून, शासनाने याचा सकारात्मक विचार न केल्यास पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उपसण्यात येईल. कोरोनाची स्थिती आणि शासनाला व प्रशासनाला सहकार्य म्हणून आज आम्ही परळीचे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत असेही ते म्हणाले.
No comments