Breaking News

एमपीएससी परीक्षा अखेर पुढे ढकलली; मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारचा निर्णय


मुंबई : मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून एमपीएससी परीक्षा अखेर पुढे ढकलली आहे. राज्यात २०० पेक्षी अधिक ठिकाणी परीक्षा होणार होत्या. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सरासर विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रचं राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातचं राज्यात रविवारी एमपीएससी परीक्षा होणार होत्या. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले असून एमपीएससी परीक्षा  पुढे ढकलण्यात आली आहे.

10 तारखेचा बंद मागे

मराठा आरक्षण संघर्ष समितीनं मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा वातावरण पेटणार असं चित्र निर्माण झालंय. नऊ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र बंद ठेवणार अशी घोषणा सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं केली होती. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक मराठा संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. सुरेश पाटील यांनी EWS आरक्षण तात्काळ लागू करा, नोकरभरती बंद करा अशा मागण्या समोर ठेवत बंदचा इशारा दिला आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कडकडीत बंद पाळला जाईल असा इशारा दिला होता. मात्र, आता परीक्षा पुढे ढकलल्याने बंद मागे घेण्यात आला आहे.
No comments