Breaking News

सासऱ्याने विधवा सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडलं; जालन्यातील धक्कादायक घटना

 


पोलिसांनी  आरोपी सासरा आणि त्याच्या मुलाला केलं अटक 

अंबड : सासऱ्याने सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. विधवा सूनेचे अनैतिक संबंध असल्याने सासऱ्याने हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सासरा आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे.

अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारात हा प्रकार घडला. भागवत प्रल्हाद हरबक आणि मारिया विनोद लालझरे अशी मृतांची नावे आहेत. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं बथवेल संपत लालझरे आणि त्याचा दुसरा मुलगा विकास लालझरे अशी असल्याची माहिती अंबड ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय मारियाच्या पतीचा १० वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. यानंतर ती सासरच्यांसोबतच राहत होती. त्याच गावात राहणाऱ्या २७ वर्षीय भागवतसोबत तिचे प्रेमसंबंध होते. भागवत विवाहित होता. मारियाच्या सासरच्यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी भागवतला धमकावले होते.

भागवतने यानंतर अंबड पोलीस ठाण्यात तसंच जिल्हा पोलीस महासंचालकांकडे आरोपी सासरे आणि त्याच्या मुलाविरोधात तक्रार दाखल करत आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. ३० मार्च रोजी मारिया आणि भागवत पळून गुजरातला गेले होते. यानंतर मारियाच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. २२ एप्रिलला पोलिसांनी त्यांना गुजरातहून परत आणलं. त्यानंतर दोघेही गावात एकत्रच राहत होते असं पोलिसांनी सांगितलं आहे.

२८ ऑक्टोबरला दोघेही एका कार्यक्रमानिमित्त जवळच्या गावात गेले होते. यावेळी आरोपी विकासने ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि चिरडलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेलं जात असतानाच मृत्यू झाला. भागवतच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून विकास लालझरे आणि त्याच्या वडिलांवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून अधिक तपास करत आहेत.
No comments