Breaking News

राज्यात सर्व प्रथम लोकपत्रने अंकाची किंमत वाढ करुन क्रांतिकारी निर्णय घेतला-वसंत मुंडे

 

बीडमध्ये पेपर विक्रेत्या एजंटांनी केले ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत बीड :  वृत्तपत्र क्षेत्राला अर्थीकदृष्या सक्षम करण्यासाठी औरंगाबाद येथे राज्यातील पहिली संपादकांची गोलमेज परिषद घेतली. आणि वृत्तपत्राच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अंकाची विक्री किंमत वाढविण्याचे आवाहन केले. या आवाहनास मराठवाड्यात सर्व प्रथम दैनिक लोकपत्रने सकारात्मक प्रतिसाद देत अंकाची विक्री किंमत दुपटीने वाढवली. आज दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर तीन रुपये किमतीवरून सहा रुपये किंमत केली. पत्रकार संघाच्या भूमिकेचे हे मोठे यश म्हणावे लागेल. पत्रकार संघाची भूमिका वृत्तपत्रांना आर्थिक सक्षम करण्याची आहे. त्यामुळे या निर्णयाकडे गांभीर्याने पाहुन इतर दैनिकांनी देखिल पुढाकार घेत आपल्या अंकाची किंमत वाढवून ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार होणे गरजेचे आहे असे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा अंकाची किंमत वाढली पाहिजे या भूमिकेचे प्रणेते वसंत मुंडे यांनी व्यक्त केले.

बीड येथील पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय कार्यालयात दैनिक लोकपत्र किंमत वाढीच्या प्रथम अंकाचे विमोचन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या हस्ते दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर रविवार दि. 25 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले. यावेळी बीड शहरातील प्रमुख वृत्तपत्र विक्रेते सुदाम चव्हाण, विद्याभूषण बेदरकर, परमेश्‍वर खरात, प्रतीक भोंडवे, सुमूर्ती वाघिरे, पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय संघटक तथा बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, दैनिक लोकपत्रचे बीड जिल्हा प्रतिनिधी तथा पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ जाधव आदि उपस्थित होते. 

पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अंकाच्या किंमतीत वाढ झाली पाहिजे हा निर्णय घेण्यासंदर्भात राज्यभरात भूमिका मांडली. या भूमिकेचे राज्यात पहिल्यांदा दैनिक लोकपत्रने अंमलबजावणी करत दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर अंकाची किंमत तीन रुपयांवरून सहा रुपये केली. शिवाय वृत्तपत्र विक्रेत्यांना पन्नास टक्के कमिशन जाहीर केले. या ऐतिहासिक निर्णयाने वृत्तपत्रासह वृत्तपत्र विक्रेत्यांना देखील याचा आर्थिक फायदा होणार आहे. जर या पद्धतीने सर्वच वृत्तपत्रांनी आपल्या अंकाची किंमत वाढवली तर वृत्तपत्रांवर आलेले आर्थिक संकट लीलया पार पडेल, असा विश्‍वास वृत्तपत्र विक्रेत्यांनी व्यक्त करुन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचे विशेष अभिनंदन करत दैनिक लोकपत्रच्या अंकाचे विमोचन केले.


No comments