Breaking News

आष्टीच्या कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालयात सिटीस्कॅन, व्हेंटिलेटर मशीन तात्काळ उपलब्ध करा - वसीम शेख


आष्टी : येथील कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालय येथे सिटीस्कॅन व व्हेंटिलेटर मशीन तात्काळ उपलब्ध करण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसीम शेख यांनी दि. 2 ऑक्टोबर रोजी आष्टीचे नायब तहसीलदार यांना दिले आहे.

 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून कोरोना रोगांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यामध्ये आष्टी शहर आणि तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी व आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री मा. धनंजय मुंडे यांनी जिल्हा आरोग्य विभागाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. 

          नुकतेच राज्य सरकारने प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन करण्यासाठी लागणारी फी निम्म्यावर करण्याचे आदेश दिले असून प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात सिटीस्कॅन सुविधा मोफत देण्यात यावी असेही निर्देश दिले आहेत. राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवून आष्टी ग्रामीण रुग्णालयात सिटी स्कॅन व व्हेंटिलेटर या मशीन अद्यापही उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे रुग्णांना उपचारासाठी नाईलाजाने जामखेड व अहमदनगर याठिकाणी जावे लागत आहे. यामध्ये रुग्णाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील ग्रामीण रुग्णालयात सदरील सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेला निधी नेमका गेला कुठे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. आष्टी ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाबत सदरील पैकी कोणतीही सुविधा नसल्याने रुग्णांचे मोठया प्रमाणावर हाल होत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
         आष्टी ग्रामीण रुग्णालयात सिटी स्कॅन व व्हेंटिलेटर या मशीन तात्काळ उपलब्ध करून सर्वसामान्य जनतेला या दोन्ही सुविधांचा लाभ करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रवींद्र ढोबळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद निंबाळकर, अहेमद पठाण, बळीराम बळे, सचिन जाधव, प्रशांत जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments