Breaking News

परळी तालुक्यात धुवांधार पाऊस

 गाढे पिंपळगावात रत्याला आले नदीचे स्वरूप

परळी  : परतीच्या पावसाने परळी शहर व तालुक्यात जोरदार हजेरी लावली असून तालुक्‍यातील गाढे पिंपळगाव येथे अक्षरशः रस्त्यालाच  नदीचे स्वरूप आल्याचे चित्र  आज दि.11 ऑक्टोबर 2020 रोजी दिसून आले. तालुक्‍यातील बहुतांशी प्रकल्प याअगोदरच भरले असून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

    परळी शहर व तालुक्यात दि.10 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री साडेअकराच्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाने जोरदार एण्ट्री केली. आज दि.11 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी बारा वाजता पावसाने सुरुवात केली. परळी शहरासह गाढे पिंपळगाव, पांगरी, लिंबोटा, शिरसाळा, पोहनेर पिंपरी बेलंबा, कौठळी मोहा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळाला. 

      

   गत महिन्यात परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला होता. त्यामुळे परळी तालुक्यातील नागापूर येथील वान प्रकल्प परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणारा खडका बंधारा, सारडगाव येथील बोरणा प्रकल्प, चांदापूर प्रकल्प ओवरफ्लो झाले होते. आधीच हंगामी पावसाने कहर केला आहे. त्यातच  परतीच्या पावसाने परळी तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी रात्री व  रविवारी परळी शहरासह तालुक्यातील विविध भागांत पावसाने सकाळपासूनच थैमान घातले. या  पाऊसाने खरीप हंगामातील सोयाबीन, कापुस आदी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पावसात भिजून सोयाबीन अंकुर फुटण्याची शक्यता आहे. कपाशीच्या पिकाच्या उत्पन्नात मोठा फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

पावसाने मुक्काम ठोकल्यास उत्पन्न घटणार

 :  परतीच्या पावसाने परळी तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन कापूस आदी पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे पावसाने असाच काही दिवस मुक्काम ठेवल्यास तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार असून शेतकर्‍यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे जर पाऊस असाच बरसत राहिला तर याचा प्रचंड मोठा फटका बळीराजाला सहन करावा लागणार आहे.  पंचांगानुसार 13, 14, 17 ते 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील हवामान खात्यानेही मराठवाड्यासह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. असे झाल्यास आधीच अति पावसातून जी काही वाचलेली पिके आहेत ती हातची जाऊन शेती उत्पन्नावर परिणार होईल.


No comments