Breaking News

ऊसतोड कामगारांच्या भावाढीसह विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी मी कटिबद्ध - धनंजय मुंडे

येडेश्वरी साखर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामातील साखरेचे केले पूजन

बजरंग सोनवणेंनी 7 वर्षात कारखान्यावरचे कर्ज फेडले, काहींनी 5 वर्षात कारखान्यावर 250 कोटी कर्ज करून ठेवले - मुंडेंचा विरोधकांना टोला

उजनीचे पाणी मांजरा धरणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार!



केज : ऊसतोड कामगारांना त्यांच्या हक्काची भाववाढ मिळणे यासाठी आपण सातत्याने राज्य शासन स्तरावर प्रयत्नशील असून, उद्या (दि. 27) रोजी साखर संघसह, सहकार, कामगार आदी विभागांची खा. शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली असल्याचे ना. धनंजय मुंडे म्हणाले. भाववाढ हा प्रश्न योग्य भाव मिळवून देऊनच मिटवू असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. 

केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या साखर पूजन समारंभात ना. मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी संपूर्ण कारखान्याची पाहणी केली. यावर्षी चांगल्या पावसाने उसाचे पीक जोरदार असून, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या या कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला योग्य भाव मिळत आहे असे ना मुंडे म्हणाले. तेव्हा यावर्षी एफआरपी पेक्षा 50 ते 100 रुपये प्रतिटन भाववाढ देऊ असा शब्द श्री सोनवणे यांनी दिला.

दरम्यान बजरंग सोनवणे यांनी आपले विचार मांडताना येडेश्वरी साखर कारखाना स्थापन केल्यापासून या 7 वर्षात कारखान्याकडे असलेले 70 कोटी रुपये कर्ज परतफेड करून अंतिम टप्प्यात आणले असल्याचे सांगितले. यावेळी ना मुंडे यांनी त्यांचे कौतुक करतच, तुम्ही 7 वर्षात कर्ज फेडले, आता नवीन प्लांट उभा करत आहात, परंतु मी ज्या कारखान्याचा सदस्य आहे, त्या कारखान्यावर संचालक मंडळाने 250 कोटींचे कर्ज करून ठेवले आहे, असा टोला धनंजय मुंडे यांनी विरोधकांना लगावला.

दरम्यान ऊसतोड मजुरांच्या बाबतीत आपण पूर्वीच्या सरकार प्रमाणे केवळ गप्पा मारणारे नसून प्रत्यक्ष कृती करणारे आहोत, ऊसतोड कामगारांच्या जीवनात आर्थिक उत्कर्ष साधून, मजुराचा ऊस उत्पादक झाला पाहिजे, तेव्हाच खरे समाधान मिळेल असेही ना. मुंडे म्हणाले.

यावेळी ना. मुंडे यांच्यासह आ. संजय दौंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, शिवाजी सिरसाट, पृथ्वीराज साठे, दत्ता आबा पाटील, विलासकाका सोनवणे, शंकर उबाळे, बबन लोमटे, नंदूदादा मोराळे, बाळासाहेब बोराडे, नारायण घुले यांसह आदी उपस्थित होते.

धनेगावच्या मांजरा धरणाचे जलपूजन संपन्न, उजनीचे पाणी मांजरा धरणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न - ना. मुंडे


दरम्यान आज (सोमवार) दुपारी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत धनेगाव ता. केज येथील मांजरा धरणाचे विधिवत जलपूजन करण्यात आले. गेल्या काही वर्षानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातील धरणे मोठ्या प्रमाणात भरले असून, शेतकरी व नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा असे आवाहन यावेळी ना. मुंडेंनी जिल्हावासीयांना केले. 

यावेळी श्री. बजरंग सोनवणे, श्री. दत्ता आबा पाटील यांच्या एका शिष्टमंडळाने केलेल्या मागणीनुसार उजनीचे पाणी मांजरा धरणासाठी आणणे, तसेच मांजरा धरणाचे लाभार्थी असलेल्या उस्मानाबाद, लातूर व बीड या जिल्ह्यांना पाण्याचे समान वाटप व्हावे यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.


No comments