सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक झाडे यांनी एक लाख रुपये खर्चुन वाघेश्वरी देवस्थानाला केले प्रवेशद्वार
के. के. निकाळजे । आष्टी
महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेमध्ये ३६ वर्षे सेवा पूर्ण करून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून तीन महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झालेले धोंडीराम झाडे व सौ.शकुंतला झाडे या दाम्पंत्याने वाघेबाभुळगाव येथील वाघेश्वरी देवस्थान येथील देवस्थानचे प्रवेशद्वार असलेल्या रस्त्यावर एक लाख रु खर्चुन भव्य अशी कमान उभी करून बाभुळगावच्या वैभवामध्ये भर घातली आहे.
यावेळी सेवानिवृत्त झाडे म्हणालेेे की,वाघेबाभूळगांव माझे मूळ गाव आहे. आपल्या गावाचे आपण काही देणे लागत असल्याकारणाने व मी या गावांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी हे शिक्षण घेतले आहे.आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व आपल्या गावचे असलेले जागृत वाघेश्वरी देवस्थानच्या कृपेने मी पोलिस दलामध्ये रुजू झालो. कुठेही अडचण न येता पोलीस शिपाई या पदापासून ते पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक या पदापर्यंत जाऊन ३६ वर्ष कसलीही अडचण न येता काम करून जनतेची सेवा केली.
विशेषता कोरोनासारख्या महामारीमध्ये चोख बंदोबस्ताचे काम केले. या सर्व गोष्टी व हे कार्य आपल्या गावचे जागृत देवस्थान असलेले वाघेश्वरी देवीच्या कृपाशीर्वादाने मी करू शकलो म्हणून मी व माझी पत्नी आज या ठिकाणी येऊन आपल्या गावाचे ऋण व्यक्त करण्यासाठी मंदिराकडे जात असलेल्या रस्त्यावर ही कमानवेस उभी केली आहे .यापुढेही मी या गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे .नोकरीनिमित्त मी बाहेरगावी जरी असलो तरीही माझ्या गावावरचे प्रेम कदापि विसरणार नाही अशा भावना धोंडीराम झाडे यांनी व्यक्त केल्या.झाडे यांच्या या कार्याचे वाघेबाभूळगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले आणि सपत्नीक सत्कार केला. यावेळी गावचे सरपंच वाघ,माजी उपसरपंच लिंबराज वाघ,परममित्र विलास मेसे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments