Breaking News

ऊसतोड कामगारांच्या तोडणी दराबाबतचा करार तीन वर्षाचा करा - मोहन जाधवऊसतोडणी कामगारांचा तालखेड फाटा येथे मेळावा

तालखखेड : सध्या ऊसतोडणी कामगार हे संपावर आहेत. मागण्या मान्य झाल्या शिवाय कोणीही घर सोडणार नाही, त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या तोडणी दराबाबचा करार तीन वर्षाचा झालाच पाहिजे. अशी ठाम भूमिका सीटू ऊसतोडणी कामगार संघटनेचे नेते मोहन जाधव यांनी व्यक्त केली. आज तालखेड फाटा येथे सीटूच्या वतीने आयोजित केलेल्या ऊसतोडणी व मुकादमांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

सध्या सुरू असलेल्या संपात ऊसतोडणी कामगारांना तोडणीदर ४०० रुपये करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबतच वाहतूक दर व मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी. कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे आणि दरवाढीचा करार तीन वर्षाचा करावा या प्रमुख मागण्या जोर धरत आहेत. शासन जो पर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत कामगार कारखान्यावर जाणार नाहीत. उसतोड कामगारांच्या विम्याचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, स्थलांतरीत कामगार कायद्यानुसार कामगारांची नोंदणी करण्यात यावी. कोरोनाच्या काळामध्ये ऊसतोडणी कामगारांना वेगळा विमा लागू करण्यात यावा या मागण्या देखील होत आहेत. 

मागण्या मान्य होईपर्यंत एकही उसतोडणी कामगार कारखान्यावर जाणार नाही. असा निर्धार तालखेड येथील मेळाव्यात करण्यात आला. महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना सीटू, ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतुकदार संघटना महाराष्ट्र राज्य (VBA) या संघटनांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव, शेतमजुर युनियनचे नेते कॉ. सुदाम शिंदे, माकप तालुका सचिव कॉ. मुसद्दीक बाबा सर, धमायानंद साळवे, ऍड. सय्यद याकुब, गणेश ढाकणे सर, बळीराम भुंबे, रामराव राठोड, कॉ. आबा राठोड, तालखेडचे उपसरपंच विनायक चव्हाण, विजय राठोड, उपसरपंच अनिल राठोड, पंडीत ओव्हाळ, अंकुश अण्णा जाधव, मधुकर आडागळे, रामा राऊत, दिपक खरात, विनायक राठोड, भारत जाधव, विकास राठोड, शिवाजी जाधव, शंकर राठोड, भारत राठोड, रामेश्वर जाधव, भिमराव जाधव, राजु राठोड, गणेश राठोड, नामदेव राठोड, कैलास मोरे, प्रशांत उपदेशी, विद्यासागर रमेश महाराज, आदी उपस्थित होते. तर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ऊसतोड कामगार मुकादम बंडु राठोड हे होते. या मेळाव्यात परिसरातील शेकडो ऊसतोडणी कामगार आणि मुकादम उपस्थित झाले होते. 


उद्या पासून जिल्हाभरात निदर्शने..
उद्या पासून जिल्हाभरात तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण निदर्शने करण्यात येणार असल्याचे या मेळाव्यात जाहीर करण्यात आले. No comments