Breaking News

क्षीरसागर बंधूंना आमदार क्षीरसागरांचा हिसका-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी मळ्याच्या प्लॉटिंगचे 50 लाखांचे बेटरमेंट चार्ज बुडवले

-आ. संदीप क्षीरसागरांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकार्‍यांसमोर सुनावणी

- जयदत्त क्षीरसागरांनी 3 हजार 150 ची छाननी फिसही भरली नाही

-नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागरांसह माजी मंत्री क्षीरसागरांनी केला पदाचा गैरवापर

-जिल्हाधिकार्‍यांसमोर सिद्ध झाली प्रकरणात अनियमितता, माजी मंत्री, विद्यमान नगराध्यक्ष क्षीरसागर बंधूंच्या अडचणी वाढल्या

बीड :  माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नावे असलेल्या भुखंड विक्रीसाठी नगरपालिकेत 50 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा बेटरमेंट चार्ज न भरता नगरपालिकेचे नुकसान करत भ्रष्टाचार केल्या प्रकरणाची तक्रार विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या समोर झाली असता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांसह नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे उघड झाले असून नगरपालिकेचा तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा कर बुडवल्याचे दिसून येते. हे प्रकरण जयदत्त क्षीरसागरांसह भारतभूषण क्षीरसागर यांना चांगलच भोवणार असल्याचे दिसून येत आहे. 

सर्वसामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणावर आणि कठोर पद्धतीने कर वसुली करणार्या बीड नगरपालिकेत क्षीरसागर बंधूंनी मात्र कर बुडवेपणा केल्याचे एक प्रकरण विद्यमान आमदार संदीप क्षीरसागरांनी उघडकीस आणले आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मालकीच्या सर्वे नं. 8 व 9 तरफ खोड मळ्यामधील भुखंडाचे क्षेत्रफळ 8 लाख 75 हजार 563 चौ.फुट असून हे क्षेत्र खरेदी-विक्री करण्यासाठी जो बेटरमेंट चार्ज नगरपालिकेला भरावा लागतो तो 50 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा आहे. हा चार्ज भरण्यासाठी आपल्याला सवलत देण्यात यावी, अशा ाशयाचे शपथपत्र तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड नगर पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकार्‍यांकडे दिले होते मात्र या पत्रावर तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी कुठलीही सवलत दिली नव्हती तरीही जयदत्त क्षीरसागरांनी आपल्याच ताब्यात असलेल्या आणि भाऊ भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष असल्याने दोघांनीही पदाचा गैरवापर करत सदरचे लाखो रुपयांचे बेटरमेंट चार्ज नगरपालिकेत भरले नाही आणि नगरपालिकेसह बीड शहरातील जनतेचे नुकसान केले. या प्रकरणी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत याबाबत कारवाई सुरू झाली तेव्हा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. 

सुनावणी दरम्यान माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व भारतभूषण क्षीरसागर यांच्यामार्फत वकीलाने बाजू मांडली. इकडे संदीप क्षीरसागर यांच्या वतीने अ‍ॅड.बालासाहेब गिते यांनी पुराव्यानिशी बाजू मांडली तेव्हा सदरील प्रकरणात जयदत्त क्षीरसागरांसह डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पदाचा गैरवापर केल्याचे आणि लाखो रुपयांचे बेटरमेंट चार्जेससह  अन्य चार्जेस भरले नसल्याचे उघड झाले. याबाबत दि.29-9-2020 रोजी झालेल्या सुनावणीत आणि युक्तीवादात 5 महत्वाच्या बाबी निदर्शनास आल्या असून जी जागा 2011 व 15 मध्ये डेव्हलपमेंट व रिडेव्हलपमेंटसाठी वापरण्यात आली त्यापैकी काही जागेची अधिन्यास मंजूरी जून 2000 मध्ये झाल्याची संचिका सुद्धा दिसून आली परंतु त्या लेआऊटमधील भुखंडाची विक्री झाली का? किंवा त्या भुखंड मालकाची संमती 2011-15 मधील प्रकियेसाठी घेतली होती का? याविषयी जयदत्त क्षीरसागरांच्या वकीलाला माहिती देता आली नाही त्याचबरोबर सन 2011 मधील प्रक्रियेमध्ये दि.27-4-2011 लेआऊट मंजुरी आदेश, दि.13-5-2011 सर्व चार्जेस भरण्याचे पत्र, दि.20-11-2001 बेटरमेंट डेव्हलपमेंट चार्जेस एकत्र न भरता जसे भुखंड विक्री होतील तसे चार्जेस भरण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र दि.10-12-2012 न.प.च्या जनरलाईज ठरावात मान्यता देण्यात आली परंतु या ठरावाचे कन्फरर्मेशन नगरपालिकेत सादर नसल्याचे किंवा मागणी प्रमाणे मान्यता देणारे कुठलेही पत्र उपलब्ध नसल्याचे या सुनावणीत उघड झाले. विशेष म्हणजे हे भुखंड विकण्यासाठी जी प्रक्रिया छाननणी 2011 साली झाली त्या छाननीची फिस 3 हजार 150 रुपये हे जयदत्त क्षीरसागरांनी भरलेले नाहीत. रेखांक मंजुरीतील खुल्या रस्त्याच्या जागेची 2011-15 च्या प्रक्रियेत नगरपालिकेच्या नावे खरेदीत अद्याप नसल्याचेही उघड झाले आहे. त्याचबरोबर विभागाच्या दि.29-6-1994 शासन निर्णय अथवा इतर कोणतीही तरतूद अशी दाखवण्यात आली नाही ज्यामुळे अशा पद्धतीने बेटरमेंट चार्जेस भरण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे सदरचा ठराव हा बेकायदेशीर घेण्यात आल्याचे सुनावणीत निष्पन्न झाले आहेत. सदरचा प्रकार हा अत्यंत गंभीर असून जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी भुखंडाबाबतच नाही तर अन्य बाबतीतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आजपर्यंत आरोप झाले ते अशा प्रकरणाने आता उघड होत आहेत.

जनतेचे जेवढे खाल्ले ते तर वापस घेणारच परंतु जे, दोषी आहेत ते जेलमध्ये जातील-आ.संदीप क्षीरसागर
जनतेची सेवा करण्याचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा जनतेशी इमाने इतबारे काम करणार असल्याचे आपण वचन दिले होते त्याचबरोबर भ्रष्टाचार्यांना आपल्याकडे थारा नाही आणि यापुढे शहरातले सर्व विकास कामे दर्जेदार करून घेणार, असं आश्वासन जनतेला दिलं होतं, त्यानुसार 2012 साली मंजूर झालेले शहरातील जिल्हा रुग्णालय ते बशीरगंज, सुभाष रोड यासह त्यावेळेस झालेले काही कामे 2018-19 मध्ये आपण करून घेतले आहेत. आताही 2014-15 साली कामाच्या ऑर्डर निघालेल्या होत्या ते कामे केवळ आम्ही लक्ष ठेवले म्हणून क्षीरसागर बंधूंच्या घशात गेले नाहीत. आम्ही जेव्हा त्या कामांची वर्कऑर्डर, इस्टीमेट, लेजर रिपोर्ट मागू लागलो तेव्हा भर पावसाळ्यात रस्त्याचे कामे करण्यासाठी शहरातील रस्ते खोदले, परंतु जोपर्यंत वरील बाबी मिळत नाहीत आणि दर्जेदार काम होण्याचा विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत क्षीरसागर बंधूंच्या प्रत्येक बोगस कामावर आपलं लक्ष राहणार असल्याचे संदीप क्षीरसागरांनी म्हटले. आजपर्यंत जनतेचे जेवढे खाल्ले ते तर वापस घेणारच परंतु जे दोषी आहेत ते तर जेलमध्ये जातीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात सध्या रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत, काम बंद आहेत याबाबत नगरपालिकेकडे दि.3 मार्च 2020 रोजी माहिती मागवण्यात आली परंतु अद्याप एकाही कामाची माहिती नगर पालिकेच्या मुख्याधिकार्यांकडून देण्यात आलेली नाही. याबाबत आपण विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दिला असल्याचे संदीप क्षीरसागरांनी म्हटले. 

सुभाष रोडच्या धर्तीवर शहरातल्या रस्त्यांची कामे उभा राहून करून घेणार-आ.संदीप क्षीरसागर
लाखो-करोडो रुपयांचे कामे घशात घालण्याचा प्रताप नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी वेळोवेळी केला. ज्याप्रमाणे सुभाष रोडसह अन्य रस्त्याची कामे उभा राहून दर्जेदार पणे केले त्याप्रमाणेच शहरातील अन्य रस्त्यांची कामे उभा राहून दर्जेदार करणार असल्याचे आ. संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. सदरची कामे दर्जेदार व्हावेत यासाठी नगरपालिकेकडे इस्टीमेट, वर्कऑर्डर, लेजर रिपोर्ट मागवले आहेत ते जाणीवपूर्वक देण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु आता त्यांना हे सर्व द्यावे लागेल आणि दर्जेदार कामे करावेच लागतील. शहरात दर्जेदार कामे व्हावेत, विकास कामाच्या एकाही पैशाचा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी मी सदैव प्रयत्न करत असून लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दिवसाची रात्र करून शहरातल्या रस्त्यांच्या कामा बरोबरच अन्य कामे पूर्ण करून घेणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून हे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येणार आहेत.
No comments