Breaking News

'सीटू'चे जिल्हाकचेरी समोर निदर्शनेऊसतोड कामगारांच्या तोडणी दरात वाढ करुन कायदा करा ; आंदोलनकर्त्यांनी केली मागणी

बीड : सीटू ऊसतोडणी कामगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आपल्या मागण्यांचे निवेदन साखर आयुक्तांना पाठवले. ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करा आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी सध्या हे संप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दररोज सीटू संघटना कामगारांना सोबत घेऊन जिल्हात कृती करत असल्याचे ऊसतोडणी कामगार नेते मोहन जाधव यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत साखर आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात सीटूने म्हटले आहे की, ऊसतोडणी कामगारांचा तोडणीदर ४०० रुपये करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबतच वाहतूक दर व मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी. कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे आणि दरवाढीचा करार तीन वर्षाचा करावा. ऊसतोडणी कामगारांच्या विम्याचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, स्थलांतरीत कामगार कायद्यानुसार कामगारांची नोंदणी करण्यात यावी. कोरोनाच्या काळामध्ये ऊसतोडणी कामगारांना वेगळा विमा लागू करण्यात यावा या मागण्या सीटूने केल्या आहेत.

या आंदोलनात सीटू ऊसतोडणी कामगार संघटनेचे नेते मोहन जाधव, विनायक चव्हाण, रोहिदास जाधव, डीवायएफआयचे तालुका अध्यक्ष सुहास जायभाये, तालुका सचिव प्रा. कुंडलिक खेत्री, डॉ तांदळे, चेअरमन रोहिदास जाधव  शिवाजी जाधव, विजय राठोड, सुरेश राठोड, दत्ता सौंदरमल, मिठू वाघमारे, वैजनाथ राठोड, बाळू राठोड आदी सहभागी झाले होते.

 


No comments