Breaking News

जयभवानी शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत प्राचार्य डॉ.पटेल यांचे योगदान मोलाचे - अमरसिंह पंडित

कोरोना नियमांचे पालन करत सहकार्यांनी दिला भावपूर्ण वातावरणात डॉ.पटेल एस. डी. यांना निरोप
गेवराई :   ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टक-यांच्या मुला-मुलींना शिक्षण मिळावे यासाठी दादांनी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यांच्या दुरदृष्टी उद्दिष्टपूर्तीसाठी प्राचार्य डॉ.पटेल एस.डी. यांनी आपल्या सेवा काळात प्रामाणिकपणे आणि संस्थेशी निष्ठा राखत काम केले. जयभवानी शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत प्राचार्य डॉ. पटेल यांचे योगदान खूप मोठे आणि मोलाचे आहे असे गौरव उद्गार  जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केले. शिवाजीनगर (गढी) ता. गेवराई येथील जयभवानी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य डॉ. पटेल एस. डी. यांच्या सेवापूर्ती समारंभात त्यांना भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा देताना ते बोलत होते.
शिवाजीनगर (गढी) ता. गेवराई येथील जयभवानी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य डॉ. एस. डी. पटेल यांच्या सेवापूर्तीनिमित्त सत्कार समारंभाचे बुधवार दि ३० सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि शासनाच्या नियमाचे पालन करून हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर हे तर प्रमुख अतिथी म्हणून जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, जयभवानी कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे, माजी जि. प..सदस्य बाबुराव काकडे, अमरसिंह पंडित यांचे स्विय सहाय्यक अमृत डावकर, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, मुख्य लेखापाल प्रताप हातोटे, भागवत चव्हाण, अनिल गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाळेच्यावतीने डॉ. पटेल यांचा शाल, फेटा, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि मानाचा आहेर देत सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.पटेल यांच्या पत्नी सौ.जहिदा पटेल, मुलगा डॉ. रियाज पटेल व मुलगी आफरीन पटेल हेही उपस्थित होते. 


या कार्यक्रमाला जयभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते परंतु मुंबई येथे बैठकीसाठी जावे लागल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी त्यांनी खास भ्रमणध्वनीवरून उपस्थितांशी संवाद साधत डॉ. पटेल यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. पटेल यांनी केलेल्या कामाचा गौरव करताना त्यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला. ग्रामीण भागातील मुलांना मिरीटनुसार प्रवेश देताना प्रवेशासाठी संधी देण्याचा एक पॅटर्न पटेल यांनी निर्माण केला तो मला फार महत्वाचा वाटतो असे सांगून त्यांनी सतत संस्थेशी एकनिष्ठ राहून अतिशय तळमळीने काम केले. संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.  यावेळी माजी सभापती कुमारराव ढाकणे, श्रीराम आरगडे, अमृत डावकर, प्रमोद गोरकर, प्राचार्या डॉ.कांचन परळीकर यांनीही आपल्या भाषणातून डॉ. प्राचार्य पटेल यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. शाळेचे सहशिक्षक अकबर पठाण तसेच प्रा.अशोक मुंडे यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात बोलताना भाऊसाहेब नाटकर म्हणाले की, प्राचार्य डॉ.पटेल यांनी आपल्या सेवा काळात उत्कृष्ट कार्य करून ईतर  मुख्याध्यापक आणि शाळा प्रमुखांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या आदर्शाचे पालन करावे आणि आपली संस्था अजून कशी मोठी होईल यासाठी इतरांनीही काम करावे असेही ते यावेळी म्हणाले. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.पटेल यांनी भावनिक होवून संवाद साधला. आदरणीय शिवाजीराव (दादा) पंडित साहेब यांनी मला संस्थेत सेवा करण्याची संधी दिली. आदरणीय भैय्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी या संधीचे सोने केले. संस्थेने मला खूप मोठा मान दिला, सन्मान दिला. माझी कदर केली यासाठी मी आयुष्यभर संस्थेशी नतमस्तक राहील. हा प्रज्वलीत झालेला यज्ञ पुढे कधी विझू देवू नका, कवच म्हणून भैय्यासाहेब सदैव माझ्या पाठिशी राहिले त्यांच्या कायम ऋणात राहील असे सांगत ते भावनिक झाले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सत्यप्रेम लगड यांनी केले, सुत्रसंचलन माधव चाटे यांनी तर आभार गायकवाड के. एन. यांनी मानले. 

यावेळी जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेतील विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, प्राचार्य, प्राध्यापक, माजी मुख्याध्यापक आणि प्राचार्य, उपस्थित मित्रमंडळी, पाहुणे यांनीही प्राचार्य डॉ. पटेल यांचा विविध भेटी देत  सत्कार केला. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक सानप आर. एस. आणि त्यांच्या सर्व सहकारी शिक्षक आणि प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. यावेळी केक कापून डॉ. पटेल यांचा वाढदिवस साजरा करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. पटेल यांच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले. या कार्यक्रमास कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सर्व नियमांचे पालन करत संस्थेतील विविध मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक आणि डॉ.  पटेल यांचे कांही मित्र, पाहुणे, काही विद्यार्थी उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.


No comments