Breaking News

एसबीआय फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जोपासते : नंदकिशोर भोसले


पाच गावातील ग्रामसेवा प्रकल्पाचे हस्तांतरण 

दिंद्रुड :  एसबीआय फाउंडेशन ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था असून समाजातील शेवटच्या घटकांचा पायाभूत विकास साधण्यासाठी काम करत असल्याचे प्रतिपादन नंदकिशोर भोसले यांनी केले. पंचक्रोशीतील पाच गावातील ग्रामसेवा प्रकल्पाचे हस्तांतरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

            

   हिंगणी (बु.) ता.धारुर येथे गांधी जयंतीचे औचित्य साधून सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिलासा संस्था, यवतमाळ व एसबीआय फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्यातून सुरू असलेला एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प ग्रामपंचायत, महिला समिती व गावकऱ्यांकडे  हस्तांतरण करण्यात आला. हा कार्यक्रम संपूर्ण भारत देशात एकाच वेळी 50 गावात व्हर्चुयल पद्धतीने घेण्यात आला.  एसबीआय चे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले, चीफ मॅनेजर आनंदकुमार मिश्रा , सामाजिक कार्यकर्ते बंडुजी खांडेकर, सरपंच मिराताई खाडे, उपसरपंच योगेश सोळंके, बालासाहेब सोळंके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

             एसबीआय फाऊंडेशन यांनी दिलासा संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प धारुर तालुक्यातील पाच गावात राबविला आहे. संस्थेच्या वतीने आपल्या गावात विकासाचे रोपटे लावले असून त्याच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नंदकिशोर भोसले यांनी केले. या प्रकल्पाचा वटवृक्ष कसा होईल यासाठी प्रयत्नशील रहा असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते  बंडूजी खांडेकर यांनी गावाच्या विकासासाठी अहोरात्र काम करत असलेल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा आणि आपले गाव विकसित करा असे आवाहन केले. तसेच सर्व मान्यवरांनी  समयोचित भाषणे केली. 

        ग्रामसेवा प्रकल्पाच्या कार्यात योगदान देणाऱ्या स्टाफ व स्वयंसेवकांना  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.  या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकल्प व्यवस्थापक वली तांबोळी यांनी केले तर सूत्र संचालन सचिन उजगरे यांनी केले. आभार एकनाथ शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाचे चोख व्यवस्थापन श्रीकांत सोंनकांबळे, प्रकाश घुले व सर्व प्रकल्प स्टाफने केले.


No comments