Breaking News

मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिनच्या बंद दरवाज्याला शिवसंग्राम महिला आघाडीकडून बांगड्यांचा आहेर


कित्येक महिन्यांपासून नगरपरिषदेत गैरहजेरी; बीडकरांमध्ये या निगरगट्ट अधिकाऱ्यांविरुद्ध संताप - मीराताई डावकर 

बीड :  शहरातील रस्त्याप्रश्नी ३ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत आपल्याच मौजमजेत राहणाऱ्या मग्रूर मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिनच्या दरवाज्याला आज बांगड्यांचा आहेर शिवसंग्राम महिला आघाडीकडून देण्यात आला. उपोषणाला बसलेल्या व्यक्तींना साधे विचारात नसणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसंग्राम महिला आघाडी शिष्टमंडळाला हे अधिकारी येतच नसल्याचे माहित झाल्याने त्यांनी हा आहेर दरवाज्यातच मुख्याधिकारी यांच्यासाठी दिला. जे अधिकारी महिनोन्महिने आपल्या कार्यालयातच उपस्थित राहत नाहीत ते बीडकरांच्या सेवेत ठेऊनच काय उपयोग? असे यावेळी शिवसंग्राम महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीराताई डावकर यांनी म्हंटले आहे. 

   

शहराची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना शहराच्या समस्यांचे काहीएक देणेघेणे दिसत नाही. शहरातील पिंपरगव्हाण रोड,शाहूनगर, हिरालाल चौक, मोंढा रोड आदी भागातील रस्त्यांची कामे जाणीवपूर्वक रखडवले गेले आहेत. शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास होत आहे. बीडकरांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असे मीराताई डावकर यांनी म्हंटले आहे. यावेळी शिवसंग्राम महिला आघाडी सरचिटणीस साक्षीताई हांगे, चंद्रकला पगडूळवले, मीराताई दोडके, खांडेकर मॅडम आदींची उपस्थिती होती.

No comments