Breaking News

भगवान भक्तीगडावरील दसरा मेळावा यंदा होणार ऑनलाईन

दरवर्षी गर्दीचा विक्रम होतो, यंदा कार्यक्रमांचा विक्रम करा - पंकजाताई मुंडे यांचे आवाहन

गांवात राहूनच भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक व्हा ; दर्शनानंतर सावरगांव येथूनच करणार मार्गदर्शनबीड :  कोरोना महामारीच्या संकटामुळे राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा दसरा मेळावा यंदा ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी घेतला आहे. भगवान भक्तांनी आपापल्या गावांत राहूनच भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक व्हावे असे सांगत दरवर्षी गर्दीचा विक्रम होतो यंदा कार्यक्रमांचा विक्रम करा असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, पंकजाताई मुंडे दस-याला भगवान भक्तीगडावर जाणार असून तिथूनच ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत अशी  माहिती त्यांच्या फेसबुक पेजवरून देण्यात आली आहे.

  यासंदर्भात अधिक माहिती देतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, आपल्या दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे  दसरा मेळाव्याची तुम्ही जशी आतुरतेने वाट पाहत असता तशी मी पण तुमच्याहूनही जास्त आतुरतेने  या शुभ मुहूर्ताची, सीमोल्लंघनाची वाट पाहत असते. लोकनेते मुंडे साहेबांनी सुरू केलेली ही भक्ती आणि शक्तीची परंपरा वर्षानुवर्षे आपण चालू ठेवत आहोत. आज देशातच नाही तर जगामध्ये फार मोठ्या महामारीने कोरोनाच्या रूपाने लोकांच्या समोर एक संकट उभे केले आहे. आपल्या लोकांना आपल्या जीवापेक्षा जास्त जपणं हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत.  भक्ती आणि शक्तीच्या परंपरेला यशस्वी करणारे तुम्ही सर्व माझी शक्ती आहात, त्यामुळे ही शक्ती कुठल्याही अर्थी क्षीण होऊ नये असा माझा सदैव प्रयत्न राहिला आहे. माझ्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष आहे. काल जो मराठवाड्याचा दौरा केला तेव्हा लोकांची गर्दी पाहून  लक्षात आले की, या गर्दीपेक्षा कितीतरी पट जास्त गर्दी भगवान भक्तीगडावर असते, लाखोंच्या संख्येने भगवान भक्त भगवानबाबांच्या जन्मस्थळी सावरगाव येथे येतात आणि माझ्या भक्ती व शक्तीच्या परंपरेला यशस्वी करतात असे त्या म्हणाल्या. 

गावात राहूनच भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक व्हा


मुंडे साहेबांनी तुमच्यावर केलेलं प्रेम जपण्याची परंपरा मला चालवायला सांगितली त्यामुळे  कोरोनाच्या या महामारीत एवढ्या लाखो लोकांचं आरोग्य संकटात टाकणं हे मुंडे साहेबांच्या व तुमच्या कन्येला शोभणार नाही, म्हणून मी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला आहे की, दसऱ्याची ही परंपरा चालूच राहील पण यावर्षी ही वेगळ्या अर्थाने चालू राहील.   यावर्षी पुरते आपण भगवान भक्ती गडावर न येता आपापल्या गावी भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन सीमोल्लंघनाची एक वेगळी परंपरा करू. इतकी वर्षे संख्येचा विक्रम आपण स्थापन केला तो लोकांच्या संख्येचा होता आता तो कार्यक्रमांच्या संख्येचा करू असे त्या म्हणाल्या.

म्हणून..यंदा ऑनलाईन संबोधन

सर्व भगवान भक्तांना पंकजाताई मुंडे यांनी विनंती केली आहे की, स्वतःचा व लोकांचा  जीव धोक्यात घालून भगवान भक्ती गडावर येण्याऐवजी आपला भगवान भक्तीगड यावर्षी पुरता आपल्या गावामध्ये घेऊन जा. भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक व्हा. भगवान बाबांचे पूजन करा आणि त्यानंतर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. कारण मी पण परंपरा तोडणार नाही. तुम्हीही तोडायची नाही, फक्त बदलत्या काळानुसार यंदा 'ऑनलाईन' दसरा साजरा करणार आहोत. दसऱ्याला मी भगवान बाबांच्या दर्शनासाठी सावरगांवला जाणार आहे आणि तिथूनच आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. सर्वांना भगवान भक्ती गडावरचा कार्यक्रम कळवला जाईल आणि दसऱ्याला आपण काय कार्यक्रम घ्यायचे त्याचे सुद्धा पूर्ण वेळापत्रक हे माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवले जाईल असेही पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. माझ्या आवाहनाला स्वीकारून  लेकीचा जन्म झालेल्या  परिवाराने भगवान भक्ती गडावरून धागा बांधलेला आहे आणि ही परंपरा कायम केली आहे. यावेळी आपण  सीमोल्लंघनाचा वेगळा असा निश्चय करा आणि सर्वात जास्त संख्येने भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन हा भगवान भक्ती गडाचा मेळावा गावोगावी साजरा करा असे आवाहन त्यांनी केले आहे.No comments