Breaking News

आ. विनायक मेटेंनी थेट शेतातील चिखलात उतरत शेतकऱ्यांचे दुःख सरकारला दाखवले"परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला; राज्य सरकारनी शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी"

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत मुख्यमंत्र्यांनी स्व बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सिद्ध करावा - आ विनायक मेटे

आजही सुरु राहणार नुकसान पाहणी दौरा; १ किमी बैलगाडीतून शेतात जाऊन आ मेटे यांनी शेतकऱ्यांना दिला आधार

बीड :  शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी काल दि १७ ऑक्टोबर २०२० रोजी शिरूर व बीड तालुक्यातील नुकसान पाहणीचा दौरा केला. यामध्ये त्यांनी थेट शेतात अतिवृष्टीने झालेल्या चिखलात उतरत राज्य सरकारला शेतकऱ्यांची दयनीय स्थिती दाखवली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मुंबई सोडावी, शेतकऱ्यांच्या मदतीला सातत्याने येणाऱ्या स्व बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना  तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत देऊन सिद्ध करावा असे आवाहन यावेळी आ विनायक मेटे यांनी केले. बीडसह शिरूर तालुक्यातील पौंडूळ, खांबा - लिंबा, खालापुरी या गावातील नुकसानीची पाहणी आ मेटे यांनी केली.
    

परतीच्या पावसाने राज्यात बऱ्याच ठिकाणी प्रचंड नुकसान केलेले आहे. शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेली पिके अक्षरश वाहून गेली आहेत. पंचनामा करण्यासाठी शेतात पिके राहिले नसल्याची गंभीर परिस्थिती सध्या आहे. शेतकऱ्यांवर एक अस्मानी संकट आलेले असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. उद्धवजी ठाकरे यांनी मुंबई सोडावी, शेतकऱ्यांच्या मदतीला सातत्याने येणाऱ्या स्व बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना  तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत देऊन सिद्ध करावा असे आवाहन आ मेटे यांनी केले. खा शरद पवार साहेबांना बीड जिल्ह्याने भरभरून प्रेम दिलेले आहे मात्र या जिल्ह्यातील शेतीचे नुकसान पाहण्यासाठी त्यांना वेळ नसल्याचे देखील आ विनायक मेटे म्हणाले.


   शेतकऱ्यांना बाकी सार्या बाबी बाजूला सारून तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत सरकारने करावी, पिकविम्याची किचकट पद्धत शेतकऱ्यांना समजत नाही, त्यामध्ये सोयिस्करपणा आणावा, मुख्यमंत्र्यांनी आश्वासने देण्याचे सोडून शेतकऱ्यांना आधार द्यावा असे आ विनायक मेटे म्हणाले. आ विनायक मेटे यांच्या दौऱ्यात जागोजागी शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आपले नुकसान दाखवत आपली कैफियत मांडली. १ किमीपेक्षा अधिक अंतर बैलगाडीतून जात शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम आ मेटे यांनी केले. उर्वरित दौरा आज होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, सरचिटणीस विनोद कवडे, बबनराव माने, वाशीम जिल्हाध्यक्ष प्रशांत गोळे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश पानसंबळ, माजी सभापती नारायण काशीद, ज्ञानेश्वर कोकाटे, तालुका उपाध्यक्ष धांडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, हनुमंत पवार, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय माने, युवक तालुकाध्यक्ष कृष्णा परजने, माउली शिंदे, दत्ता इंगळे, माउली परजने,  संजय भिंगले, नारायण परजने, युवक तालुका उपाध्यक्ष अनिल उगले, बप्पासाहेब जाधव, अशोक भाकरे, विजय सुपेकर, आदींसह विविध ठिकाणचे शेतकरी, शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.


No comments