Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडवणी येथील रेणुकामातेचा नवरात्रोत्सव साधेपणानेभाविकांसाठी दर्शन बंद; संस्थानाकडून मातेची विधिवत होणार पूजाअर्चा 

जगदीश गोरे । वडवणी

वडवणी परिसराच्या पंचक्रोशीत नवसाला पावणारी माता म्हणून प्रसिध्द असणाऱ्या वडवणी शहरातील भाविक भक्तांची आराध्यदैवता श्री.रेणुकामाता येथील यंदाचा नवरात्रोत्सव हा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा होणार असून भाविकांसाठी मंदिर व दर्शन बंद राहणार आहे. संपूर्ण नवरात्रीमध्ये श्री.रेणुकामाता संस्थान यांच्याकडून मातेची विधिवत पूजाअर्चा, घटस्थापना तसेच कोजागिरी पौर्णिमा हे अत्यंत साधेपणाने व भाविकांच्या उपस्थितीशिवाय साजरे होणार असल्याची माहिती श्री.रेणुकामाता संस्थांनाचे संस्थानप्रमुख अण्णा महाराज दुटाळ यांनी दिली आहे. 

                     याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण भाविक भक्तांना ज्या क्षणाची आतुरतेने ओढ होती असा नवरात्र महोत्सव दिनांक १७ ऑक्टोंबर २०२० शुक्रवार रोजी घटस्थापनेपासून सुरु झालेला आहे. मात्र सध्या अवघ्या जगामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले असून शासन निर्देशाप्रमाणे कोणत्याही धार्मिक स्थळांना सण, उत्सव साजरी करण्यास बंदी घालत त्या ठिकाणी भाविकांना प्रवेशबंदी केलेली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण वडवणी परिसराच्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या तसेच भाविकांच्या नवसाला पावणारी आई म्हणून प्रसिध्द असणाऱ्या वडवणी शहरातील ग्रामस्थांची आराध्यदैवता शहरातील दक्षिणेस चिंचवण रोड या परिसरात निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या श्री.रेणुकामाता संस्थान हे मागील सात महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढतच असल्याने प्रशासनाने मंदिरे, धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला असून याच अनुषंगाने येथील श्री.रेणुकामाता संस्थानातील यंदाचा नवरात्रोत्सव हा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. 

या संपूर्ण नवरात्रोत्सवा दरम्यान तसेच विजयादशमी दसरा व कोजागिरी पौर्णिमा या सर्व सण-उत्सवांना याठिकाणी भाविक भक्तांना दर्शनासाठी प्रवेशबंदी व जमावबंदी असून संपूर्ण नवरात्रीमध्ये श्री.रेणुकामाता संस्थान यांच्याकडून मातेची विधिवत पूजाअर्चा, घटस्थापना तसेच कोजागिरी पौर्णिमा हे अत्यंत साधेपणाने व भाविकांच्या प्रवेशाविना साजरे होणार असल्याची माहिती श्री.रेणुकामाता संस्थांचे संस्थानप्रमुख अण्णा महाराज दुटाळ यांनी दिली आहे. तरी याची सर्व भाविक-भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्री.रेणुकामाता संस्थान वडवणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments