Breaking News

ना. मुंडेंनी खा. पवारांना सादर केला कामकाजाचा अहवाल!


मासिक अहवाल प्रसिद्ध करण्याची अभिनव परंपरा अबाधित

मुंबई  : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दर महिन्याला राज्य स्तरावर, बीड जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून तसेच परळी वै. या त्यांच्या मतदारसंघात केलेले कामकाज व महत्वपूर्ण निर्णय यांची माहिती अहवाल स्वरूपात सादर करण्याची परंपरा अबाधित ठेवत, आज (दि. ०७) सप्टेंबर - २०२० महिन्याचा अहवाल रा. कॉ. पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांना सादर केला आहे.

एका बैठकीनिमित्त खा. शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेऊन ना. मुंडेंनी अहवाल सादर केला. जानेवारी महिन्यात राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून दर महिन्याला केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा अहवाल स्वरूपात मांडण्याची परंपरा ना. मुंडेंनी अगदी कोरोनाग्रस्त असताना सुद्धा अबाधित ठेवली होती. त्याचाच पुढील भाग म्हणून आज ना. मुंडे यांनी सप्टेंबर महिन्याचा ३३ पानी अहवाल सादर करून परंपरा अबाधित राखली आहे.

धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामार्फत हा अहवाल मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, रा. कॉ. चे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रियाताई सुळे, खा. सुनील तटकरे यांसह प्रमुख पक्षश्रेष्ठी यांना सादर करण्यात येणार असून राज्यातील जनतेसही अवलोकनार्थ प्रसिद्धीस देण्यात येत आहे.


गेल्या काही दिवसात राज्यातील ऊसतोड कामगारांच्या उसतोडणीची भाववाढ करण्यासह विविध मागण्या जोर धरू लागल्या आहेत, त्यासाठी अनेक पक्ष, संघटना, सामाजिक संस्था आक्रमक होताना दिसत आहेत, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र ऊसतोड कामगारांच्या मूळ प्रश्नास हात घालत, स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ जलद गतीने कार्यान्वित करण्यात येऊन त्याद्वारे ऊसतोड कामगारांची नोंदणी करणे, त्यांना आरोग्यविमा कवच देणे, यासह त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणे अशी काही महत्वपूर्ण उद्दीष्टे दृष्टीक्षेपात ठेऊन महामंडळ स्थापनेच्या कार्याला गती दिली आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत चालणाऱ्या राज्यातील जवळपास ९०० विशेष शाळांमध्ये शून्य ते सहा वयोगटातील बालकांचे दिव्यांगत्व वेळीच ओळखून, त्यावर योग्य उपचार करून दिव्यांगत्व नष्ट करणे किंवा त्याची तीव्रता कमी करणे यासाठी शीघ्र निदान, शीघ्र उपचार केंद्र सुरू करण्यात येत आहेत; या व अशा महत्वपूर्ण निर्णयांची माहिती ना. मुंडे यांनी या अहवालाद्वारे प्रसिद्ध केली आहे.

जगमित्र कोरोना हेल्प सेंटर'ची राज्यात चर्चा ! 


एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करत असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या जगमित्र कार्यालयामार्फत कोरोनाग्रस्त रुग्णांची मदत करण्यासाठी स्थापन केलेले 'कोरोना हेल्प सेंटर' शेकडो रुग्णांना मदत व आधार देणारे केंद्र बनले आहे. बीड जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील देखील अनेक रुग्णांना याद्वारे मदत करण्यात आली आहे. ना. मुंडे यांनी २६ कर्मचाऱ्यांच्या मदतीने ऑनलाईन कोरोना हेल्प सेंटर उभारले असून, याद्वारे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना बेड मिळण्यापासून ते खाजगी रुग्णालयात बिलात सवलत मिळण्यापर्यंत फोन-इन मदत करण्यात येते. १ ऑक्टोबर पर्यंत या सेंटर द्वारे १५०० बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फोन द्वारे संपर्क करून त्यांची विचारपूस करण्यात आली. तर रुग्णालय, प्रशासन आदी बाबींचा समन्वय साधत ९०० हुन अधिक रुग्णांच्या समस्या सोडविण्यात या हेल्प सेंटरला यश आले आहे.

धनंजय मुंडे यांचा तगडा जनसंपर्क व जागीच प्रश्न निकाली काढण्याची पद्धत पाहता बीड जिल्ह्याबाहेरील अनेक मंडळी मदतीसाठी ना. मुंडे यांना फोन, एसएमएस द्वारे संपर्क करत असतात. एका एसएमएस वर ना. मुंडे यांच्या कार्यालयातून करमाळा ता. बार्शी जि. सोलापूर येथील लिलाबाई कांबळे या महिलेच्या रुग्णालयातील बिलाचा प्रश्न सोडवून त्यांचे ८०% बिल माफ करून देण्यात आल्याचे लिलाबाई यांचा मुलगा गौरव कांबळे यांनी सांगितले.

या हेल्प सेंटरची चर्चा आता राज्यात होऊ लागली असून, या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या हेल्प सेंटरच्या कामकाजाची पद्धत व महित्तीही ना. मुंडे यांनी या कार्य अहवालामध्ये दिली आहे.


रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना या माध्यमातून मानसिक आधार मिळावा तसेच उपचारांमध्ये कोणतीही उणीव भासू नये असा यामागे प्रमुख उद्देश असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले. दरम्यान या अहवालाद्वारे आपण सप्टेंबर महिन्यात केलेले कामकाज अवलोकनार्थ सादर करत असून, पुढेही ही परंपरा अबाधित ठेवू असेही ना. मुंडे म्हणाले.

No comments