Breaking News

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करून थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - निवासी उपजिल्हाधिकारी


बीड : 
 सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्यांवर प्रतिबंध असला तरी याचे उल्लंघन होताना आढळून येत आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रूप तर होतेच. पण कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. हे लक्षात घेऊन आता उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल. असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे.

मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या वतीने बीड जिल्ह्यात धूम्रपान बंदी व सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्यामुळे होणारे दुष्परिणाम बीडच्या जनतेला कळण्यासाठी चार दिवस प्रचार मोहीम राबविण्यात आली. यावेळी कोटपा २००३ अंतर्गत कलम चार चे फलक विविध शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल व लॉज आणि इतर व्यवस्थापनांसमोर दर्शनी भागात लावण्यात आले. यासह स्टिकर लावून जनजागृती करण्यात आली.

मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 116 मधील तरतुदी व कोटपा  २००३ च्या कायद्यातील तरतुदीनुसार सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणे आणि धूम्रपानावर बंदी असताना याचे सर्रास उल्लंघन होत आहे. हे थांबविण्यासाठी व्यापक जनजागृती व लोकसहभाग महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनीही बोलताना केले.
या व्यापक जनजागृती मोहिमेस बीड शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रचार अभियान यशस्वी करण्यासाठी बीड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तय्यब शेख, पत्रकार एस. एम. युसूफ, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे डॉ. पवन राजपूत मराठवाडा ग्रामीण विकास चे विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी यांनी परिश्रम घेतले.

No comments