Breaking News

दसरा मेळाव्यास गर्दी जमवल्या प्रकरणी पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यावर गुन्हा दाखलबीड : पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाटमध्ये ऑनलाईन दसरा मेळाव्यास गर्दी जमवून जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह रासपचे महादेव जानकर, राज्यसभा सदस्य भागवत कराड, आमदार मोनिका राजळे यांच्यासह अन्य ५० जणांवर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे गेल्या दोन वर्षांपासून दसरा मेळावा घेतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा हा ऑनलाईन घेण्यात आला. पंकजा मुंडे यांनी सावरगावघाट मध्ये येऊन संत भगवानबाबा यांचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केलं. 


जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव बंदीचे जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत. परंतु सावरगाव मध्ये पंकजा मुंडे येणार असल्याने त्यांच्या शेकडो समर्थकांनी एकच गर्दी केली होती. यामुळे अंमळनेर पोलिसांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पंकजा मुंडे, खासदार भागवत कराड, महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार भीमराव धोंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता गोल्हार, पाटोदा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा लांबरुड, सरपंच राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे यांच्यासह ५० जणांवर कलम 188, 269, 270 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  


No comments