Breaking News

रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयात राडा


तोडफोड करत डॉक्टरांना केली धक्काबुक्की, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट

बीड : येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत राडा केला. दरम्यान यावेळी वार्डात जाऊन सक्शन मशिनची तोडफोड करत डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी रुग्णालयात दाखल झाले. तसेच रुग्णालयाची सुरक्षा कडक करण्याच्या सूचना दिल्या. 

बीडच्या शासकीय रुग्णालयात सध्या कोरोनाग्रस्त आणि अति गंभीर आजारावरील रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र याठिकाणी कोरोना वार्डात रुग्णांच्या नातेवाईकांची सरार्स ये- जा सुरू असते. विशेष म्हणजे त्याठिकाणी असलेले सुरक्षा रक्षक आणि पोलिस या नात्ववाईकांना अडविण्याची तसदी घेत नसल्याची चर्चा आहे. अशातच बुधवारी सायंकाळी किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या आणि न्यूमोनिया झालेल्या संतराम थोरात या रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्या रुग्णाच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह होत्या. त्या रुग्णावर बिगर कोरोना वार्डात उपचार सुरू होते. रुग्ण लघुशंकेसाठी गेल्यानंतर परत येतांना खाली पडले. कर्तव्यावर असलेले भूलतज्ञ डॉ. काशीकर यांनी त्या रुग्णाला तातडीने व्हेंटिलेटरवर घेतले. मात्र उपचारा दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर रुग्णाचे नातेवाईक असलेले लव थोरात, कुश थोरात व अन्य एकाने वार्डात गोंधळ घालत सक्शन मशीनची तोडफोड करत बेड ही फेकून देत कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर यांना धक्काबुक्की केली. घटनेची माहिती कळताच जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी याबाबत तात्काळ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना माहिती दिली. यानंतर स्वतः जिल्हाधिकारी रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान यातील आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत असून रुग्णालयाची सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या असून कोरोना वार्डाच्या बाहेर बेरीकेट्स टाकून त्या परिसरात डॉक्टर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त कोणालाही जाऊ देऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिलेत. No comments