Breaking News

महाड दुर्घटनेत धैर्य व शौर्य दाखवणाऱ्या किशोर लोखंडेचा महाराष्ट्र सरकारने यथोचित सन्मान करावा : आ. सुरेश धस


किशोर लोखंडे यांना 51 हजार रू.मदत जाहीर समाजाने मदतीसाठी पुढे येण्याचे केले आवाहन

आष्टी :  महाड येथील इमारत दुर्घटनेत तीन वर्षीय बालक व एका महिलेसह अपघातग्रस्तांना बाहेर काढून धैर्य व शौर्य दाखवणाऱ्या पोकलेन ऑपरेटर किशोर लोखंडेचा महाराष्ट्र सरकारने यथोचित सन्मान करावा अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली असुन आ.धस यांच्याकडून किशोर लोखंडे यांना 51 हजार रूपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच समाजाने मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
पाटोद्याचा भूमिपुत्र किशोर लोखंडे यांच्या धैर्याबद्दल आ. धस यांच्या आष्टी येथील अद्वैतचंद्र निवासस्थानी झालेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लोखंडे यांच्या कुटुंबियांसह नायगावचे उपसरपंच तथा युवा नेते अशोक सुपेकर, शिवचरित्रकार ज्ञानदेव काशिद, गजानन भोसले, सचिन आघाव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी धस म्हणाले की, महाड दुर्घटनेतील पाच मजली पडलेली इमारत आणि त्यात अडकलेले जीव वाचविण्यासाठी किशोर लोखंडे याने सतत 26 तास पोकलेन चालवून अमर्याद कष्ट केले. २३ वर्ष वय असलेल्या या युवकाला दोन व्यक्तीचे प्राण वाचवण्यात यश आले. तो पाटोदा तालुक्यातील उखंडा येथील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असुन त्याच्या घरची परिस्थिती हलाकीची आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्याला दहा लक्ष रूपये रोख व शासकीय सेवेत सामावून घेऊन त्याच्या कार्याचा यथोचित सन्मान करावा यासाठी येणाऱ्या दोन दिवशीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून किशोरच्या कार्याला न्याय देणार आहे. समाजाने त्याला केवळ हार-तुरे न देता आर्थिक मदत देण्यासाठी देखील पुढे यावे असे सांगताना त्यांनी एक आठवण सांगितली. उत्तराखंड, जम्मू काश्मिर व सांगली-कोल्हापूर येथील परिस्थिती मी डोळ्याने पाहिली होती. अशा आपत्कालीन परिस्थितीत धैर्य दाखवणे खूप धाडसाचे असते. या धैर्याबद्दल मी किशोर लोखंडे, त्याचे आई-वडील आणि उखंडा गावचे अभिनंदन करतो. व समाजाने किशोरला आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करतो असे सांगितले.

[चौकट : किशोर भागवत लोखंडे यांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांचे बँक अकाऊंट डिटेल्स पुढीलप्रमाणे आहे. अकाऊंट नंबर - 62295495493 आयएफसी कोड - SBIN0020028, शाखा राजूरी वेस, बीड, या त्यांच्या स्वतःच्या अकाऊंट नंबरवर मदत करता येईल.]

No comments