Breaking News

खुल्या बाजारातील बेकायदेशीर अँटिजेंन टेस्ट किट आढळले तर कार्यवाही करणार - जिल्हाधिकारी

केजमध्ये जिल्हाधिकारी रेखावार यांनी घेतली डॉक्टर्स, मठाधिपती, पुजारी व मौलानांची बैठक

"खाजगी डॉक्टरांनी रुग्णांची कोव्हीड तपासणी केल्या शिवाय पुढील उपचार करू नयेत"


प्राथमिक आरोग्य केंद्रावरही लवकरच कोव्हीड तपासणी सुरू करणार"

गौतम बचुटे । केज 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोव्हीड संक्रमण रोखणे व त्या बाबत उपाय योजना या बाबत केज येथील वैद्यकीय व्यावसायिक, धर्मगुरू, मौलाना, पुजारी आणि मंगल कार्यालयांच्या मालकांची बैठक घेतली. यात रुग्णांची कोव्हीड तपासणी करणे आणि वेळ प्रसंगी आवश्यकता भासल्यास उपचार करण्यासाठी धार्मिक स्थळे ताब्यात घेतली जातील. यावर उपस्थितांशी चर्चा केली.


केज येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात दि.५सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर्स, मंदिरांचे पुजारी, मठाधिपती, मस्जिदींचे मौलाना व मंगल कार्यालयाचे चालक मालक यांची बैठक घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची नोंद ठेवून त्यांना उपचारापूर्वी कोव्हीड तपासणी करूनच उपचार करावेत. त्या विषयी रुग्णांचे समुपदेशन करून त्यांची तपासणी करून घेण्यासाठी प्रवृत्त करावे. संशयित रुग्णांची माहिती तात्काळ आरोग्य विभागाला देण्यात यावी. सरकारी दवाखान्यात आता चोवीस तास कोव्हीड तपासणी करण्यात येत असून लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील तपासणीची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती दिली. डॉक्टरांनी स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची देखील काळजी घेण्याचे आव्हान केले. कोव्हीडची तपासणी पूर्णपणे मोफत असून जर खुल्या बाजारात असे बोगस आणि अवैद्य किट आढळून आले; तर त्याविरुद्ध कठोर कार्यवाही करणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्याच बरोबर वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास कोरोना निश्चित बरा होतो असे सांगितले. तर उपचारासाठी वेळ प्रसंगी धार्मिक स्थळे आणि मंगल कार्यालयेही ताब्यात घेतली जातील. असे सांगितले.
या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी डॉक्टरांच्या शंकांचे निरसन केले. तसेच लोखंडी सावरगाव येथील अद्यावत कोव्हीड सेंटर व त्यातील सुविधेची माहिती दिली.  खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध ठेवण्याचे सांगितले.

बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपजिल्हाधिकारी श्रीमती जाधव, तहसीलदार दुलाजी मेंढके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, नायब तहसीलदार धस, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, मुख्याधिकारी विशाल भोसले हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 
केज येथील डॉ चाटे, डॉ नेहरकर, डॉ वायबसे, डॉ ठोके, डॉ राऊत यांच्यासह डॉक्टर्स, पुजारी, मौलाना व मंगलकार्यालयाचे मालक उपस्थित होते.

No comments