Breaking News

अहमदपूरचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन

नांदेड : राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते १०४ वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी (३१ ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते. 
राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराजांचा जन्म  १९१७ साली झाला होता. १९३२ साली वीर मठ संस्थान अहमदपूरचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची घोषणा झाली होती. महाराजांनी १९४५ साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत, वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. २००७ मध्ये त्यांना राष्ट्रसंत पुस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 

लिंगायत समाजातील नावाजलेल्या महाराजांपैकी एक. वयाच्या १०४ वर्षीही ते कार्यमग्न असत. अहमदपूर मठाशी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या भागातील भक्तगण जोडलेले आहेत.
लाहोर विद्यापीठात स्वतंत्र पूर्व काळात एमएमबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. लिंगायत धर्म प्रसारात ते सतत कार्यरत राहिले.
वृक्ष जोपासना, राष्ट्र धर्म, राष्ट्रप्रेम या त्रिसूत्रीवर त्यांनी काम केले आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनात त्यांची भूमिका आणि सहभाग महत्वाचा होता. यासाठी राज्यभर लाखोंच्या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले. विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी मार्गदर्शक असेच आहे.' असं त्यांनी म्हटलं आहे.

No comments