Breaking News

मजुरांना रात्री-अपरात्री पळवून नेणार्‍या खाजगी मुकादमावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आ. सुरेश धस

के . के. निकाळजे । आष्टी 

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर डांगशिरवाडे येथील ऊसतोड मजुरांच्या वाहनाला सटाणा तालुक्यात अपघात होऊन त्यामध्ये तीन मजूर जागीच मरण पावले असून सात मजूर जखमी झालेले आहेत.

या मजुरांना घेऊन जाणाऱ्या मुकादमावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे. ऊसतोडणी मजुरांच्या दरामध्ये वाढ करण्यात यावी तोपर्यंत मजुरांनी गावातून कारखान्याकडे जाऊ नये असे आवाहन करण्यासाठी आ. सुरेश धस यांनी आणि गोपीनाथराव मुंडे साहेब ऊसतोड मजूर मुकादम वाहतूकदार संघटना व महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोड मजूर संघटना तसेच मित्र संघटनानी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ ,पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जागृती चर्चासत्र दौरा सुरु केला आहे.त्यानिमित्ताने धुळे जिल्ह्यात असताना या अपघाताची बातमी समजतात त्यांनी पिंपळनेर डांगशिरवाडे या गावी जाऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. अस्तेवाईकपणे विचारपूस केली.त्यावेळी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

आ. धस पुढे म्हणाले, साखर कारखानदारांनी मजुरांना द्यावयाची मजुरीचे दर वाढवून देण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू झाले असून मजुरीचे दरवाढ जाहीर केल्याशिवाय ऊसतोडणीसाठी मजुरांना मुकादमांनी कारखान्याकडे हलू नये असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साखर कारखानदार मुकादमांना प्रलोभने  दाखवत असून मुकादम लोक मजुरांना रात्री-अपरात्री चोरट्या मार्गाने लपूनछपून जात असल्यामुळे मजुरांचा जीव धोक्यात घातला जात आहे. आदिवासी मजुरांच्या जीवाला काही किंमत नाही काय? असा सवालही आ.सुरेश धस यांनी केला आहे.


या मरण पावलेल्या मजुरांचे कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरवणे सक्तीचे करावे अशी आमची मागणी असून मरण पावलेल्या तीन मजुरांच्या आणि गंभीर जखमी झालेल्या इतर सात मजुरांचे कुटुंबीयांना आर्थिक मदत शासनाने जाहीर करावी तसेच या मजुरांना घेऊन जाणाऱ्या खाजगी मुकादमाकडून आर्थिक भरपाई वसूल करावी आणि त्यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्याऐवजी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई तात्काळ करण्याची मागणी देखील आ. सुरेश धस यांनी केली आहे.


No comments