Breaking News

सरकारला जागं करण्यासाठीच धार्मिक स्थळांसाठी आंदोलन : इम्तियाझ जलील


औरंगाबाद : धार्मिक स्थळं उघडण्याबाबत आंदोलन करण्यामागे सरकारला जागे करणे हा एकमेव उद्देश होता. मंदिर, मशीदी आता उघडल्या पाहिजेत. तसेच सरकारला जे काही नियम लागू करायाचे आहेत तेदेखील त्यांनी करावेत. आज जेव्हा मी मशिदीत जाण्यासाठी निघालो तेव्हा मला पोलिसांनी अडवले आणि ताब्यात घेतले होते, अशी माहिती एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.


मशिद जाऊन उघडयाची आणि अनेक लोकं एकत्र जमवायची हा विचार यामागे नव्हता. सरकारनं धार्मिक स्थळं खुली करण्याबाबत लवकरात लवकर काही निर्णय घ्यावा हा यामागील उद्देश होता. काल मंदिरासाठी आंदोलन केलं आणि मशिदीत जाण्यापासून थांबवलं याचा अर्थ आम्ही आंदोलन थांबवलं असा होत नाही. आम्ही आंदोलन पुढे सुरू ठेवणार असल्याचंही जलील यांनी स्पष्ट केलं.

“धार्मिक स्थळं खुली करणे ही लोकांची भावना आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर करत आम्ही आंदोलन करत आहोत. यानंतर सरकार कमीतकमी जागं होईल ही अपेक्षा आहे. आज आम्ही औरंगाबादमध्ये आंदोलन केलं. परंतु जर धार्मिक स्थळं खुली केली नाहीत तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करू,” असा इशाराही त्यांनी दिला. तसंच हे होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा असेही जलील म्हणाले.

धार्मिक स्थळं सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. पोलीस यात काहीही करू शकत नाहीत. आम्ही पोलिसांच्या कामाचा आदर करतो. त्यांनी त्यांचं काम करावं आणि आम्ही लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आधारावर पुढे काम सुरू ठेवणार असल्याचंही जलील यांनी स्पष्ट केलं.

No comments