Breaking News

संतोषीमाता ट्रस्ट मंदिराचे 27 लाख परस्पर उचलले


अध्यक्ष अ‍ॅड.ओमप्रकाश जाजूविरूध्द तक्रार
बीड : येथील मोंढा भागातील श्री दक्षिणमुखी हनुमान संस्थान अर्थात संतोषीमाता ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.ओमप्रकाश जाजू यांनी मंदिर संस्थानचे द्वारकादास मंत्री बँकेत असलेल्या खात्यावर जमा असलेले 26 लाख 80 हजार रूपये स्वत:च्या खात्यावर परस्पर वर्ग करून उचलले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संस्थानच्या ट्रस्टींमध्ये खळबळ माजली असून याप्रकरणी ट्रस्टींच्यावतीने पेठ बीड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत तक्रारीत म्हटले आहे की, अ‍ॅड.ओमप्रकाश जाजू हे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि संतोषीमाता मंदिराचे अध्यक्ष आहेत. या संस्थानचे येथील द्वारकादास मंत्री बँकेत खाते असून त्या खात्यावर 26 लाख 80 हजार जमा होते. ओमप्रकाश जाजू यांनी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी अंधारात ठेवून बँकेचे अध्यक्ष असल्यामुळे आपल्या स्वत:च्या अधिकारात रक्कम काढून अपहार केला आहे. जाजू यांनी यामध्ये एका ट्रस्टीची बनावट स्वाक्षरीही चेकवर केली आणि आपल्या मुलांच्यानावे अनुक्रमे नंदकिशोर ओमप्रकाश जाजू आणि राधेशाम ओमप्रकाश जाजू यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियात असलेल्या खात्यावर बेकायदेशीर वर्ग केले आहेत. या प्रकारामुळे संस्थानच्या ट्रस्टींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अ‍ॅड.ओमप्रकाश जाजू यांनी आतापर्यंत अनेक संस्थांमध्ये ब्लॅकमेल करून प्रवेश मिळवला आहे व प्रत्येक संस्थांमध्ये हेच प्रकार केला असल्याचा संशय ट्रस्टी घेवू लागले आहेत. विशेष बाब म्हणजे देवाच्याच पैशावर डल्ला मारल्याने समाजामध्ये देखील संताप व्यक्त केला जात आहे. या मंदिराचे प्रथम अध्यक्ष कै.रामकुवर रामचंद्र मुंदडा बार्शीकर होते. आणि अशोककुमार ओझा सचिव होते. या दोघांनी पै पै करून लोकसहभागातून हे मंदिर उभे केले. आणि मंदिरामध्ये मोठा पैसा जमा केला. मात्र विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड.जाजू यांनी याच पैशावर डल्ला मारला. मारवाडी समाजातील एका सर्वपरिचीत आणि चांगल्या घरातील व्यक्तीने असा प्रकार केल्याने समाजात देखील संताप व्यक्त केला जात असून याच प्रकरणी ट्रस्टीच्यावतीने सचिव अ‍ॅड.लड्डा यांनी पेठ बीड पोलिसामध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी हा अर्ज चौकशीसाठी ठेवला आहे.

No comments