Breaking News

कंटेंमेंट क्षेत्र असलेल्या आश्रमात चोरट्यांचा धुमाकूळ


धारुरच्या महानुभव पंथ आश्रमातील घटना, भक्तांमध्ये संताप

धारूर : बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यातस सुरवात केली आहे. आष्टी आणि परळी येथील घटना ताजी असताना आज सकाळी धारूर येथील एका आश्रमात चोरट्यांनी डल्ला मारल्याचे उघड झाले. चिंचपूर रस्त्यालगत असलेल्या गीता ज्ञान आश्रमातील १२ साधकांना कोरोनाची बाधा झाल्याने हा आश्रम प्रतिबंधीत करण्यात आला आहे. याचीच संधी साधून चोरट्यांनी आश्रमाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत पेट्यांची तोडफोड करत मुद्देमाल लंपास केला.  घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस घटनास्थळी दाखल झाल्या. 
मिळालेल्या माहितीनुसार धारूर येथील चिंचपूर रस्त्यालगत महानुभव पंथाचे कृष्ण मंदिर व गीता ज्ञान आश्रम आहे. या आश्रमात पाच पुरुष व आठ वयोवृद्ध महिला साधक निवास करतात. काही दिवसांपूर्वी या आश्रमातील १२ साधकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे गत ८ दिवसांपासून आश्रमाला ताळे लावण्यात आले होते तर प्रशासनाने आश्रम परिसर कंटेंमेंट क्षेत्र म्हणून घोषित केला होता.
मंगळवारी (दि.२५) सकाळी आश्रमाची दारं व ताळे तुटलेल्या अवस्थेत व परिसरात पेट्यांची तोडफोड केलेली आढळून आले. प्राथमिक पाहणी नुसार याठिकाणी चोरट्यांनी हातसाफ केल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस घटनास्थळी दाखल झाल्या. हा परिसर बाधित व कंटेंमेंट झोन असल्याने सर्व नियमांचं पालन करून तपास करणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

No comments