Breaking News

शिक्षक पदासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या पात्र ज्येष्ठ उमेदवारांना न्याय द्या - इंजि. शे. मु. मोईज़ोद्दीन


बीड :  शिक्षक पदासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या पात्र ज्येष्ठ उमेदवारांना न्याय द्यावा. अशी मागणी इंजिनीयर शेख मुहम्मद मोईज़ुद्दीन यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि शिक्षण संचालकांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
 दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय किंवा संस्थांच्या शाळेत भरती न निघाल्याने टीईटी परीक्षा उत्तीर्ण असलेले पात्र उमेदवार सुशिक्षित बेरोजगार म्हणुन जीवन कंठीत आहे. त्यांचे जगण्याचे बळ दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात नैराश्‍य आले आहे. हजारो टीईटी पात्र उमेदवार शिक्षक पदी कर्तव्य बजावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यांना अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही अजून शिक्षक पदी संधी मिळालेली नाही. यातून अनेक पात्र उमेदवारांची वयोमर्यादा संपण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे. त्यांचा कोणी वाली नाही. एकीकडे पात्र उमेदवारांची अशी अवस्था असताना, त्यांना नोकरीची वानवा असताना, पुन्हा नव्याने टीईटी परीक्षा घेऊन सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढवण्या मागे काय परियोजना आहे ? हे कळायला मार्ग नाही ! वास्तविक पाहता अगोदर प्रथम प्राधान्य जे उमेदवार टीईटी उत्तीर्ण होऊन बसलेले आहेत, त्यांना शिक्षक पदी भरती करावयास हवे. त्यांचा प्रश्न मार्गी लावायला हवा. पण पूर्वीच्या उमेदवारांची दखल न घेता, नवे उमेदवार जे टीईटी उत्तीर्ण झाले अशांना दोन-दोन लाख रुपये घेऊन काही संस्थांच्या शाळांत शिक्षक पदी भरती करण्यात येत आहे. तर अनेक टीईटी अनुत्तीर्ण उमेदवारांना वशिलेबाजी सह दोन-दोन लाख रुपये घेऊन संस्थांच्या शाळेत शिक्षक पदी सामावून घेतले जात आहे. हा अनेक वर्षांपासून टीईटी उत्तीर्ण होऊन शिक्षक पदी भरती होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांवर सरळ-सरळ अन्याय आहे. हा प्रकार थांबायला हवा, बंद व्हायला हवा. याकरिता याबाबत खालील बाबींवर योग्य निर्णय घेऊन त्यास मूर्त रूप द्यावे - टीईटी पात्र उमेदवारांमधून ज्येष्ठता यादीत असलेल्यांना नोकरीसाठी अगोदर संधी द्यावी. जे पात्र उमेदवार वयोमर्यादा संपण्याजवळ आले आहेत, अशांची वयोमर्यादा संपण्यापूर्वी त्यांची शिक्षक पदी नियुक्ती करावी. जोपर्यंत पूर्वीचे एकूण एक पात्र उमेदवार नोकरीस लागत नाहीत, तोपर्यंत टीईटी परीक्षा घेण्यातच येऊ नये. टीईटी उत्तीर्ण असणाऱ्यांची ज्येष्ठता डावलून कनिष्ठ उमेदवारांना नोकरीत घेण्यात येऊ नये. टीईटी अनुत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक पदी सामावून घेतलेल्या शैक्षणिक संस्थांची चौकशी करण्यात यावी आणि अशा पद्धतीने भरती केलेल्या संस्थांवर कडक कारवाई करण्यात यावी. जर ज्येष्ठांना डावलून कनिष्ठांची भरती होत असेल तर तिथे भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होते. अशा वेळी शासनाने अशा संस्थाचालकांवर योग्य ती कारवाई करावी आणि टीईटी उत्तीर्ण असलेल्या हजारो सुशिक्षित बेरोजगार पात्र उमेदवारांना न्याय द्यावा. अशी मागणी करून जर ज्येष्ठांवर अन्याय होणार असेल तर मग शासन-प्रशासना विरोधात आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा ही निवेदनातून देण्यात आला आहे.


No comments