Breaking News

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. 15 सप्टेंबरपर्यंत दंडाची रक्कम न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि तीन वर्ष वकिली करता येणार नाही. न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने ही शिक्षा ठोठावली आहे. आता प्रशांत भूषण दंड भरणार की नाही हे पाहावे लागेल.


न्या. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं की, प्रशांत भूषण यांनी आपल्या वक्तव्याला पब्लिसिटी मिळवून दिली, यानंतर कोर्टाने हे प्रकरण विचारात घेतले. या खंडपीठात न्या. बी आर गवई आणि न्या. कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे.
प्रशांत भूषण माफी न मागण्यावर ठाम आहेत. 25 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, माफी मागण्यात गैर काय आहे? हा शब्द एवढा वाईट आहे का? सुनावणीत अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी भूषण यांना समज देण्याचा सल्ला दिला होता. दुसरीकडे भूषण यांची बाजू मांडणारे वकील राजीव धवन यांनी सांगितलं की, "भूषण यांनी कोणाचा खून केला नाही किंवा चोरी केलेली नाही, त्यामुळे त्यांना शहीद करु नये."
दरम्यान एक रुपयांचा दंड हा प्रतिकात्मक आहे. हा दंड भरणं म्हणजे एकप्रकारे माफी मागण्यासारखं असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे प्रशांत भूषण दंड भरणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

No comments