Breaking News

कोरोना बाधित व्यक्तींच्या घरातील कोरोंटाईन व्यक्तींनी जबाबदारीने वागावे - सरपंच कैलास जाधव

गौतम बचुटे । केज 
केज तालुक्यातील साळेगाव येथे दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असल्याने त्यांच्या संपर्कातील कुटुंबियांचे व इतरांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. अशा होम कोरोंटाईन असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर न पडता जबाबदारीने वागण्याचे आवाहन साळेगावचे सरपंच कैलास जाधव यांनी केले आहे.

केज तालुक्यातील साळेगाव हे गाव सुमारे ४५०० लोकसंख्येचे मोठे गाव आहे. आता पर्यंत सर्वांनी खबरदारी घेतल्याने गावात कोणी कोरोना बाधित किंवा संसर्गित रुग्ण आढळून आला नाही किंवा लक्षणे दिसून आली नाहीत. मात्र दुर्दैवाने मागील चार दिवसात दोन वेगवेगळे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

 त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार सुरू आहेत. त्यांची सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. 
खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कातील व कुटुंबातील व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. एका कुटुंबाचा अहवाल आला असून एका कुटुंबाचा लवकरच अहवाल येणार आहे. मात्र खबरदारीचा व सुरक्षिततेचा उपाय म्हणून अशा बाधित रुग्णांच्या कुटुंबातील कोणीही सदस्याने सार्वजनिक ठिकाणी फिरू नये. कारण त्यामुळे फैलाव होण्याचा धोका संभवू शकतो. गावात बाहेरून येणारे सर्व रस्ते बंद केले असून मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती सरपंच कैलास जाधव यांनी दिली आहे.
साळेगाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावात संसर्ग वाढू नये म्हणून पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी व लोकप्रतिनिधी हे मेहनत घेत आहेत. मात्र या उपरही कोणी आगळीक केल्यास त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायदा-२००५ अन्वये कठोर कार्यवाही होऊ शकते. तेव्हा सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच कैलास जाधव, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी केले आहे.

No comments