Breaking News

नाव मुख्यमंत्री सडक योजना पण दर्जा मात्र सुमार...!

सातेफळ, मांगवडगाव, लाखा, हदगाव आणि डोकेकरांच्या नशिबी पुन्हा खड्यातला प्रवास !

साळेगाव ते मांगवडगाव दरम्यानचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता दोन महिन्यातच उखडला !

गौतम बचुटे | केज :
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील केज तालुक्यातील साळेगाव ते मांगवडगाव दरम्यानचा अवघ्या काही महिन्या पूर्वी तयार करण्यात आलेला रस्ता जागोजागी उखडला असून या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नशिबी पुन्हा खाचखळगे कायम आहेत.

केज तालुक्यातील साळेगाव ते सातेफळ मार्गे मांगवडगाव दरम्यान सुमारे ७.९२ किमीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत काही महिन्यापूर्वीच तयार करण्यात आलेला आहे. यासाठी २९१.९८ लाख रु. खर्च करण्यात आला आहे. हे दि. ७/९/२०१९ रोजी सुरु झाले व ते दि. ६/६/२०२० रोजी पूर्ण झाल्याची नोंद कामाच्या नामफलकावर केलेली आहे. या रस्त्यावर लहान-मोठे व मोरी पूल मिळून एकूण ८ पूल आहेत. या एकूण ७.९२ किमी लांबीच्या रस्त्या पैकी ७.७२ किमी रस्ता हा डांबरी असून २०० मीटर रस्ता हा सिमेन्ट काँक्रीटचा करण्यात आलेला आहे.

या रस्ता कामाची देखरेख करणारी कार्यकारी यंत्रणा ही कार्यकारी अभियंता (प्रधानमंत्री ग्रामसडक योजने) महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड आहे. तर  ग्रामीण विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी अर्थसहाय्य केलेले आहे. मात्र अवघ्या काही महिन्यातच हा रस्ता साळेगावाचा बाजार क्वार्नर ते मांगवडगाव पर्यंत प्रत्येकी १५० ते २०० फुटाच्या अंतररावर जागोजागी उखडला असून खड्डे पडायला लागले आहेत. तसेच साईड पट्ट्याही खचलेल्या आहेत. तरी देखील प्रशासकीय अधिकारी आणि या कामाचे अभियंता एवढे कुंभकर्णी झोपेत आहेत हे विशेष.
सदर कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

【】 अनेक वर्ष या रस्त्याने प्रवास करणारे मांगवडगाव, सातेफळ, लाखा, हदगाव डोका येथील नागरिक त्रस्त होते या रस्त्यामुळे दिलासा मिळेल असे वाटत असताना अवघ्या काही महिन्यातच पुन्हा त्यांच्या नशिबी कायम खाचखळगेच !

】 मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील काम जर एवढे सुमार दर्जाचे असेल तर मग इतर योजने विषयी काय अवस्था असेल !

No comments