Breaking News

" मित्रांनो ! घाबरू नका ....! "

या संदेशाने साळेगावकरांचा जीव भांड्यात पडला !
गौतम बचुटे | केज :
 गावात कुणालाही प्रवेश नाही....गावातील सर्व व्यवहार बंद... गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित...गाव अनिश्चित काळासाठी बंद.... यामुळे साळेगाव ता. केज येथील सर्व नागरिक धास्तावले होते. परंतु रात्री १२:०० वाजल्या नंतर एक सोशल मीडियावर संदेश आला की, " मित्रांनो..! घाबरू नका..." या एकाच संदेशाने साळेगावकर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.


साळेगाव ता. केज येथे दि. २ ऑगस्ट रोजी कृषी सेवा केंद्राच्या संपर्कात आल्यामुळे एक ३८ वर्षीय युवक हा कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. त्या नंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही अवहवाल संसर्गित नसल्याचे आले. मात्र पुन्हा त्या नंतर दि. ६ ऑगस्ट रोजी साळेगाव येथे दुसरा रुग्ण आढळून आला. त्यामुळे साळेगावकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. त्या नंतर पुन्हा त्या कुटुंबातील संपर्कातील व्यक्तींचा अहवाल काय येतो ? आणि काय नाही ? या चिंतेने सर्व गावकरी धास्तावले होते.

कारण गावात दि. ३ ऑगस्ट रोजी पहिला रुग्ण आढळून आल्या पासून गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले असल्याने गावातील सर्व व्यवहार हे अनिश्चित काळासाठी बंद आहेत.

मात्र दि.९ ऑगस्ट रोजी मध्य रात्री १:०० च्या दरम्यान एक सोशल मीडियावर मेसेज आला की, " मित्रांनो ! घाबरू नका; आमच्या कुटुंबातील सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे." या एका ओळीच्या संदेशाने साळेगावकरांचा जीव भांड्यात पडला. कंटेन्मेंट झोनची मुदत संपताच कंटेन्मेंट झोन उठण्याची प्रतीक्षा गावकरी करीत आहेत. मात्र कंटेन्मेंट झोन शिथील केला; तरी साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लघंन होणार नाही. याची दक्षता घेणे सर्वांसाठी क्रमप्राप्त आहे.
    

No comments