Breaking News

बीड पोलिसांनी केला दुचाकी चोरांचा पर्दाफाश तिघांना ठोकल्या बेड्या ; चोरीच्या ८ दुचाकी केल्या जप्त


बीड : गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. या घटनांना आणि दुचाकी चोरांना पकडण्याचं आव्हान बीड पोलिसांसमोर उभं ठाकल होत. मात्र काही केल्या दुचाकी चोरांचा माग पोलिसांना लागत नव्हता. अशातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आपल्या खबऱ्या मार्फत दुचाकी चोरांची माहिती मिळताच क्षणाचा ही विलंब न करता पोलिसांनी सापळा रचला असता शिरूर तालुक्यातील आर्वी रस्त्यावर दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात आले तर तिसऱ्याला कोळगाव (ता.शेवगाव. जि. नगर) येथे बेड्या ठेवण्यात आल्या. यावेळी त्यांच्याकडून १ लक्ष २६ हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात दिवसा ढवळ्या सार्वजनिक ठिकाणावरून तर घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीला जाऊ लागल्यानं बीडकर हैराण झाले होते तर दुसरीकडे जिल्ह्यातील विविध ठाण्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या संख्येचा आलेख वाढू लागला. त्यामुळे दुचाकीवरुन बीडकरांची घालमेल होत होती. परंतु दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल होत नसताना आणि दुचाकी चोरांचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस दुचाकी चोरट्यांचा माग घेत शनिवारी (दि.१५) शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी खबऱ्या मार्फत त्यांना निमगाव फाटा येथून दुचाकी चोर आर्वी येथे चोरीची दुचाकी घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. दरम्यान आर्वी रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला असता संशयितरित्या दोघेजण दुचाकीवर येऊ लागल्याने त्यांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. परंतू, त्यांनी दुचाकी टाकून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्या दोघांचा पाठलाग करून साईनाथ भगवान नागरगोजे (वय ३६ रा. तरडगव्हाण. ता. शिरूर), किरण बबन बडे (वय २२ रा. कोणशी ता. पाथर्डी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दुचाकीच्या कागडपत्रांची विचारपूस करण्यात आल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.  मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत त्याच्याकडील दुचाकी ह्या चोरीच्या असल्याचे सांगितले. तसेच या दोन दुचाकी चोरट्यांनिि आपला तिसरा साथीदार नितीन मच्छिंद्र खंडागळे (रा. कोळगाव, ता. शेवगाव जि. नगर)
असल्याचे सांगत तिघांनी मिळून गत महिन्याभरापासून बीड जिल्ह्यातील साक्षाळपिंप्री, सिरसदेवी, सावरगाव येथील तर नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी तसेच जालन्यातील अंबड आणि औरंगाबादेतील पैठण आदी ठिकाणावरून  दुचाकींची चोऱ्या केल्या असून आमच्या घरी चोरीच्या दोन दुचाकी आहेत. शिवाय आमचा साथीदार नितीन मच्छिंद्र खंडागळे याच्याकडे चार दुचाकी असून तो सध्या त्याची गावी कोळगाव येथे असल्याचे पोलिसाांना सांगितले. यावेळी पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता कोळगाव (ता. शेवगाव, जि. नगर) येथून नितीन मच्छिंद्र खंडागळे याला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी अशा मिळून ८ दुचाकी एकूण १ लाख २६ हजार रुपये किंमतीच्या ८ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दुचाकी चोर साईनाथ भगवान नागरगोजे, किरण बबन बडे, नितीन मच्छिंद्र खंडागळे यांच्या विरुद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उप विभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे भारत राऊत, पोउपनि एकीलवाले, भास्कर केंद्रे, श्रीमंत उबाळे, तुळशीराम जगताप, बालाजी दराडे, नरेंद्र बांगर, आलीम शेख, वाहन चालक संतोष हरके, अतुल हराळे यांनी केली. 

No comments