Breaking News

पंकजा ताईंच्या प्रचारार्थ मोदींची सभा अन् बंदोबस्तावरील पोलिसांच्या जेवणावळीचा लाखोंचा भुर्दंड खाणावळ चालकाला !


बीड :  निवडणुकांत पराभव झाल्यानंतर नेते मंडळी कशी पाठ फिरवितायेत याचा प्रत्यय परळीत पहावयास मिळालाय. भाजप उमेदवार पंकजा मुंडें यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परळीत आले होते. त्यादरम्यान त्यांना बंदोबस्त पुरविणाऱ्या पोलिसांना एका खानावळीतून जेवण देण्यात आले. त्याच लाखो रुपयांचं बिल अद्याप मिळालं नसल्याचं उघड झालंय. अनेक वेळा हेलपाटे घालून देखील बिल मिळत नसल्याने उपासमारीमुळे माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं पत्र खानावळ चालकाने लिहिले आहे. त्यामुळे  पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजप उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी येणार असल्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. याच पोलिसांची जेवणाची व्यवस्था परळीच्या  गरुकृपा या खानावळीकडे देण्यात आली. त्याचं तब्बल 2 लाख 62 हजारांचं बिल झालं. मात्र ते अद्याप खाणावळ चालकाला मिळालेच नाही. विधानसभा निवडणूकीत दारुण पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे ह्या परळीकडे फिरकल्याच नाहीत. बिल मिळावं यासाठी  खानावळ चालक संजय स्वामी यांनी पोलीस प्रशासनाचे उंबरठे झिजवले. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. अशात लॉकडाऊन सुरू झाल्याने स्वामी कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे.  उपासमारीवाचून कुटुंबांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं एक पत्र संजय स्वामी यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना लिहिल्यानंतर पोलीस दलात आता खळबळ उडाली आहे. याप्रकारणावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलणं मात्र टाळलं आहे.


1 comment: