Breaking News

आता कंडक्टरच्या हाती तिकीट मशीन- बेल ऐवजी आले घमेले आणि दगड-विटा....

कोरोना- लॉक डाऊनचा  फटका : एसटीच्या कर्मचाऱ्याला कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी नाईलाजाने करावं लागतंय काम 

गौतम बचुटे । केज 
कोरोनामुळे एसटी बंद आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी हे प्रचंड संकटात सापडले आहेत. आधीच वेतन कमी आणि त्यात एसटी बंद! म्हणून काम नाही अन काम नाही तर मग भागणार कसे ? त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकणार तरी कसा ? या जिवघेण्या समस्यांमुळे एसटी कर्मचारी खचला आहे. त्याला आता रोजंदारीच्या कामावर जाण्याची वेळ आली आहे.केज तालुक्यातील साळेगाव येथील अंबाजोगाई आगारात वाहक म्हणून काम करीत असलेले एन. व्ही. राऊत हे मागील पाच महिन्या पासून एसटी बंद असल्यामुळे नियमित आणि पूर्ण पगार होत नाही. आधीच एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन म्हणजे निव्वळ रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांपेक्षा कमी! त्यात आई वडील, पत्नी आणि लहान मुलांचा खर्च नव्हे तर दोन वेळच्या अन्नाची पंचाईत ! अशा परिस्थितीत दिवस काढावे लागत आहेत. मग घरी बसून कुटुंबाचा गाडा कसा हकायचा? त्यामुळे वाहक राऊत हे आता बांधकाम मजूर म्हणून रोजंदारीच्या कामावर जात आहेत. त्यातून किमान प्रति दिन चारशे रु. मजुरीत कुटुंबाला हातभार लावीत आहेत. दिवसभर ढोर मेहनत करून बांधकामावर सिमेंट, वाळू, विटा उचलण्याची अंग मेहनतीचे काम मोठ्या कष्टाने करीत आहेत. त्यामुळे आता अंगावर खाकी युनिफॉर्म, तिकिटांची इटीआयएम मशीन, शिट्टी आणि डब्बल बेल, सिंगल बेल हे सर्व विसरून बांधकाम मजूर म्हणून तिकीट काढून संसाराच्या गाडीला डब्बल बेल मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.
एसटीच्या कर्मचाऱ्यांची व्यथा
कोरोना महामारीमुळे देशभरात लॉक डाऊन करण्यात आले. याचा सर्वाधिक फटका राज्य परिवाहन महामंडळाला बसला. डेपोमध्ये बस थांबल्याने महामंडळाचे उत्पन्न घटले. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन कसे करावे हा प्रश्न महामंडळाला पडला. त्यामुळे राज्यातील आपल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी कर्मचारी मिळेल, ते काम करताना दिसत आहेत. अशी व्यथा कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय मांडत असून सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घेतल्यास किमान कुटुंबाला सन्मानाने तरी जगता येईल. अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांतून होत आहे.

No comments