Breaking News

गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाची जबरदस्त कार्यवाही : संघटित गुन्हेगारांच्या दोन टोळ्या जिल्ह्यातून केल्या हद्दपार तर आणखी काही रडारवर


गौतम बचुटे । केज 
बीड जिल्हयात आगामी गणेशोत्सव, मोहर्रम व इतर येणारे सण आणि उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी. समाजात शांतता नांदावी म्हणुन जिल्हा पोलीस अधीक्षक  हर्ष ए. पोद्दार यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. याच उद्देशाने त्यांनी दोन गुन्हेगारी टोळ्यावर कायद्याचा बडगा उगारीत या टोळ्यांना बीड जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश बजावला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बीड जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडून गुंडगिरीला आळा घालण्यासाठी व गुन्हेगारावर नियत्रंण ठेवण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन महाराष्ट्र पोलीस कायदा ५५, ५६, ५७ या कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजले आहे. या पुर्वी पोलीस ठाणे गेवराई येथील म.पो.का. ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव प्राप्त झाला होता. सदर प्रस्तावा मधील तीन इसमांची टोळी असुन त्यांची गावात व गेवराई तालुक्यात त्यांची लोकांमध्ये दहशत असल्याने त्यांना एक वर्षासाठी बीड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तसेच पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण येथील म.पो.का. ५५ प्रमाणे एक हद्दपार प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्या मधील दोन इसम यांची अंबाजोगाई तालुक्यात लोकांमध्ये दहशत असल्याने त्यांचे पासुन लोक त्रस्त होते. त्यांच्या वर्तनामुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण झाला होता. समाजात शांतता राहावी व हद्दपार इसमांनी पुन्हा गुन्हे करु नयेत म्हणुन त्यांच्या टोळीची पांगापांग करणेसाठी दोन्ही टोळीतील एकुण ५ इसमांना जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बीड जिल्ह्यातुन एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.
तसेच गणपती उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राहवी म्हणुन जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या रेकॉर्डवर असलेल्या आणखी काही गुंड प्रवृत्तीच्या इसमांवर व गुन्हेगारावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाद्वारे बीड जिल्ह्यातुन हद्दपार करण्याचे प्रस्तावित आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि पोलीस प्रशासनाच्या या कार्यवाही मुळे गुन्हेगार व संघटित गुन्हेगारी टोळ्या यांच्यात खळबळ उडाली असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

No comments